नाशिक : पन्नास रुपयांच्या पेट्रोलसाठी गुलाबी नोट, पेट्रोलपंप चालकांची अडचण | पुढारी

नाशिक : पन्नास रुपयांच्या पेट्रोलसाठी गुलाबी नोट, पेट्रोलपंप चालकांची अडचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत २ हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी पेट्रोलपंपावर गर्दी केली आहे. अवघे ५० ते १०० रुपयांचे इंधन भरून वाहनचालक २ हजार रुपयांची नोट देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सुटे पैसे उपलब्ध असल्यावर किंवा जास्त इंधन भरल्यानंतरच २ हजार रुपयांची नोट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय चलनातील २ हजार रुपयांची नोट जमा करण्याच्या हालचाली भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितल्या आहेत. एका वेळेस एक नागरिक १० नोटा बँकेत जमा करू शकतो. त्यामुळे नोटाधारकांनी नोटा जमा करण्यासाठी बँकेतही गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक जण या नोटांमार्फत दैनंदिन किंवा मोठे आर्थिक व्यवहार करीत नोटा इतरांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरासह जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवरही हे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सुमारे ४५० पेट्रोलपंप आहेत. त्यापैकी अनेक पंपांवर ५० ते १०० रुपयांचे इंधन भरल्यानंतर वाहनचालक २ हजार रुपयांची नोट देत असल्याने पेट्रोलपंपचालकांनाही उर्वरित पैसे देताना दमछाक होत आहे. सुटे पैसे नसल्याने ग्राहकास उर्वरित पैसे देण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. तसेच नोट स्वीकारण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने स्पष्ट आदेश दिलेले नसल्याचे सांगत पेट्रोलपंपचालक नोट स्वीकारण्याबाबत मार्गदर्शन मागवत आहेत. त्याचप्रमाणे जास्त इंधन भरल्यानंतरच २ हजार रुपयांची नोट स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोलपंपचालकांनी घेतला आहे.

याआधी दैनंदिन भरण्यात २ हजार रुपयांची १ किंवा २ नोट असायची. मात्र, आता ३० ते ४० नोटा येत आहेत. आगामी दिवसांत हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नोट स्वीकारली, तरी सुट्या पैशांची अडचण येत आहे. त्यामुळे वादाचे प्रसंगही होत आहेत. बँकेकडून किंवा केंद्र सरकारकडून नोटा स्वीकारण्यासंदर्भात स्पष्ट सूचना, नियमावली देणे अपेक्षित आहे.

– भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन.

हेही वाचा :

Back to top button