धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 20 लाखांचा निधी | पुढारी

धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 20 लाखांचा निधी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाच्या दुरावस्थेकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने आंदोलन करून लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत धुळ्याचे एम आय एम चे आमदार फारुक शाह यांनी या स्मारकाची पाहणी करून स्मारकाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी वीस लाखाचा निधी दिला आहे.

धुळ्यात पांझरा नदीच्या काठावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून येथे स्मारक तयार करण्यात आले आहे. मात्र या स्मारकाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचा आरोप करीत दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटाने आंदोलन केले. या आंदोलन प्रसंगी शिवसैनिकांनी महानगरपालिकेतील सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले. विशेषता महापौर प्रतिभा चौधरी आणि उपमहापौर नागसेन बोरसे या दोघांच्या प्रभागात हे स्मारक येत असताना भारतीय जनता पार्टी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तर धुळ्याची भारतीय जनता पार्टी केवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा वापर करून भांडवल करत असल्याची टीका देखील करण्यात आली. या आंदोलनाला दोन दिवस उलटल्या नंतर आता धुळ्याचे एम आय एम चे आमदार फारुक शाह यांनी या स्मारकाला आज भेट दिली. यावेळी आ.शाह यांनी स्मारकाची माहिती जाणून घेतली.

आ. फारूक शाह यांनी स्मारकाची पाहणी करून पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपयांचा  निधी दिला. पाहणी करतांना आमदार शाह यांच्या सोबत शिवसेनेचे महेश मिस्तरी, नगरसेवक नसीर पठाण, नगरसेवक सईद बेग, आमिर पठाण, डॉ.दिपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, सउद सरदार, इब्राहीम पठाण, जमील खाटीक, आसिफ शाह मुल्ला, डॉ.पवार, परवेज शाह, हलीम शमसुद्दिन, मुद्दसर शेख, फिरोज शाह, उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button