जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण | पुढारी

जळगाव : अमळनेरच्या बीएसएफ जवानाला आसाममध्ये वीरमरण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अरुणाचल प्रदेशात जाताना अमळनेर तालुक्यातील बीएसएफ जवानाच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. लीलाधर नाना पाटील (४२) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील लोण येथील रहिवाशी लीलाधर पाटील हे आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ वाढवून घेतला होता. याचदरम्यान लीलाधर पाटील यांची आसाम राज्यातील गुवाहाटी येथून अरुणाचल प्रदेशात बदली झाली होती. अरुणाचल प्रदेश हे आसाम राज्यापासून ४०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सैन्य दलाच्या ट्रकमधून लीलाधर पाटील यांच्यासह २० जवानांची एक तुकडी अरुणाचल प्रदेश सेवेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी मार्गस्थ झाली होती. बीएसएफचे पथक पहाडी मार्गाने अरुणाचल प्रदेशात जात असताना या वाहनात जवान लीलाधर पाटील हे मागच्या बाजूने बसलेले होते. या प्रवासादरम्यान अचानक ट्रकचे मागचे फाटक तुटल्याने लीलाधर पाटील हे वाहनातून खाली फेकल्या गेले. यावेळी त्यांना जबरदस्त मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. दरम्यान, लीलाधर पाटील यांचे पार्थीव उद्या गुरुवारी (दि. १८) रोजी त्यांच्या मूळ गावी लोण येथे आणण्यात येणार आहे. याठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लीलाधर यांच्या पश्चात आई मीराबाई, वडील नाना पाटील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने लोण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा:

Back to top button