नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी | पुढारी

नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

नाशिक परिक्षेत्रात लाच घेणाऱ्या किंवा मागणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होत आहे. यंदा १ जानेवारी ते १५ मे या कालावधीत विभागाने ६६ सापळ्यांमध्ये १०० लाचखोरांना पकडले आहे. त्यात वर्ग एक ते चार, इतर लोकसेवक व खासगी व्यक्तींचाही समावेश आहे.

नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १५) रात्री ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर लाचखोरांची शंभरी झाली आहे. राज्यात नाशिक विभागाने सर्वाधिक ६६ सापळे रचले असून कारवाईत आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे. नाशिकच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केल्या जात असून सर्वसामान्य नागरिकांकडून लाच घेणाऱ्या किंवा मागणाऱ्यांना पकडले जात आहे. विभागाच्या कारवाईत पथकाने वर्ग एकचे सहा अधिकारी जाळ्यात फसले आहेत.

जाळ्यात फसलेले वर्ग एकचे अधिकारी

नंदुरबार येथील प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक महेश हिरालाल काळे यांना लाच स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पकडले. नाशिक भूमीअभिलेख विभागाचे अधीक्षक तथा उपसंचालक असलेला महेशकुमार महादेव शिंदे (रा. पंडित कॉलनी, नाशिक) यास ३१ जानेवारी २०२३ रोजी कार्यालयातच ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर ३ मार्चला नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील यांना ३ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. ८ मार्चला धुळे येथे वीज वितरण कंपनीतील वित्त व लेखा विभागातील व्यवस्थापक अमर अशोक खोंडे यांना २ लाख रुपयांची लाच घेतांना पकडले. २२ एप्रिलला सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय महादेव केदार यांना ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पकडले. त्यानंतर १५ मे रोजी जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यास ३० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

वर्गनिहाय कारवाई

वर्ग —- लाचखोरांची संख्या

वर्ग १ —- ६

वर्ग २ —- १२

वर्ग ३ —- ४८

वर्ग ४ —- ८

इतर लोकसेवक —- ९

खासगी व्यक्ती —-१७

हेही वाचा :

Back to top button