…तर एसटीवरही कारवाई करणार ! लग्न, पर्यटनामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक | पुढारी

...तर एसटीवरही कारवाई करणार ! लग्न, पर्यटनामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शाळांना सुट्या लागल्याने शहरवासीय पर्यटनाला अधिक पसंती आहे. तसेच लग्नसराईची धूम असल्याने एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे. आरटीओ विभागाच्या वतीने क्षमतपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई केली जाते. त्यानुसार एसटीच्या बसगाड्यांनाही हा नियम लागू असून, क्षमतपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणार्‍या एस.टी. गाडयांवर कारवाई करू, असा इशारा आरटीओ अधिकार्‍यांनी दिला आहे. कुठलेही खासगी वाहन असो वा एसटी महामंडळाची बस यांच्यात आसनक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणे नियमांचे उल्लंघन करणारे ठरू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने वाहतूक करणार्‍या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जाऊ शकते. सुट्यांमुळे पुणे विभागातील सर्वच मार्गांवर एसटीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे बसची संख्या वाढवण्यात आली आहे.

प्रवासी जास्त, एसटी कमी
एसटीला होणारी गर्दी पाहता एसटीची संख्या कमी आणि प्रवासी जास्त असेच म्हणावे लागेल. राज्यात बसची संख्या 14 हजार 600 एवढी आहे. शिवाय 55 लाख प्रवासी या एसटी बसमधून प्रवास करतात. एवढ्या प्रवाशांसाठी या बस पुरेशा नाहीत. दरम्यान, वाढलेल्या प्रवासी

संख्येमुळे 29 कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली जाते. एसटी महामंडळाची बस आहे म्हणून तिच्यासाठी वेगळी नियमावली नाही. एसटीमध्येही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतील तर त्या बसवर कारवाई केली जाईल.
         -मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

Back to top button