नाशिक : महिला ग्रामपंचायत सदस्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू | पुढारी

नाशिक : महिला ग्रामपंचायत सदस्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नाशिक, वावी : सिन्नर तालुक्यातील मीठसागरे येथील ३२ वर्षीय ग्राम पंचायत सदस्य नंदा योगेश चतुर यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. नंदा चतुर या शेततळ्यात पाणी भरण्यासाठी डोंगळा (पाइप) टाकत असताना त्यांचा तोल जाऊन पाय घसरला व शेततळ्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. सोमवारी सकाळी लवकर उठून चतुर या शेततळ्याकडे गेल्या असल्याचे सागण्यात आले. त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या वस्त्यांवरील नातेवाईकांकडे चौकशी केली. यावेळी शेततळ्याकडे पाहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडालेले अवस्थेत नंदा चतुर यांचा मृतदेह आढळून आला.

त्यांचे पती योगेश चतुर यांनी याबाबत वावी पोलीस ठाण्यात कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार दशरथ मोरे, सोमनाथ इल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नंदा चतुर या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सरपंचपद महिला राखीव असल्याने आवर्तन पद्धतीने त्यांना देखील सरपंचपद भूषवण्याची संधी मिळणार होती असे सांगण्यात येते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पश्चात पती व दोन मुले असा आहे.

याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार इल्हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button