बेळगाव : पुतण्याची बाजी तर काका पराभूत | पुढारी

बेळगाव : पुतण्याची बाजी तर काका पराभूत

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  हुक्केरी मतदारसंघाची सत्ता गेली 38 वर्षे कत्ती कुटुंबीयांकडे आहे. आजोबापासून आता नातवापर्यंत या मतदार संघाने कत्ती कुटुंबीयांकडे आमदारकी बहाल केली आहे. उमेश कत्ती यांचे पुत्र निखिल कत्ती यांनी विधानसभेत विजय मिळवला असलातरी त्यांचे काका रमेश कत्ती यांना मात्र चिकोडी, सदलगा मतदार संघातून पराभव पत्कारावा लागला आहे.

हुक्केरी मतदार संघ हा तसा 1985 पासून पक्षाचा नव्हे तर कत्ती कुटुंबियाचा बालेकिल्ला राहिला आहे. विश्वनाथ कत्ती यांच्यापासून उमेश कत्ती यांच्यापर्यंत या कुटुंबाची राजकारणावर व सहकार क्षेत्रावर पकड राहिली. उमेश कत्ती यांचे वडील विश्वनाथ हे एकदा हुक्केरी मतदार संघातून निवडून आले. त्यांच्या अकाली निधानमुळे उमेश कत्ती यांना जनता पक्षाने प्रथम त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी आठवेळा जनता दल, भाजपाकडून आमदार म्हणून हुक्केरी मतदारसंघाचे नेतृत्व केले.

उमेश कत्ती यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होणार होती. मात्र, विधानसभेचा कालावधी केवळ सहा महिने राहिल्यामुळे पोटनिवडणूक होऊ शकली नाही. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेश कत्ती यांचे बंधू रमेश कत्ती यांनीही हुक्केरीसाठी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी उमेश कत्ती यांचे पुत्र निखिल कत्ती यांना हुक्केरीची उमेदवारी दिली तर चिकोडी-सदलगा मतदार संघाची उमेदवार रमेश कत्ती यांना देण्यात आली.

रमेश कत्ती हे चिकोडी मतदार संघात आयात केलेले उमेदवार ठरले. दुसर्‍या बाजूला निवडणुकीच्या केवळ आठ दिवस आधी रमेश कत्ती यांचे नाव जाहीर करण्यात आले. भाजप स्थानिक इच्छुक नेत्यांनीही कत्ती यांना मदत केली नाही. काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी हे गेली पाच वर्षे मतदार संघात विकासकामे राबवत होते. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाला मतदारांनी साथ दिल्याने रमेश कत्तीचा पराभव झाला. गणेश हुक्केरींना 1 लाख 28 हजार 349 तर रमेश कत्तींना 49 हजार 840 मते मिळाली. कत्तींचा तब्बल 78 हजार 509 मतांनी पराभव झाला.

हुक्केरी मतदार संघात निखिल कत्ती यांना 1 लाख 3 हजार 574 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ए. बी. पाटील यांना 61 हजार 23 मते मिळाली. पाटील यांचा 47 हजार 449 मतांनी पराभव झाला. निखिल यांनी बाजी मारली. तर उमेश यांचे बंधू व निखिल यांचे काका रमेश कत्ती यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Back to top button