जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा! | पुढारी

जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. आता गिरणा धरणातून चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील १३ गावांना १४ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. ४० गावांसाठी ४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठा असल्याने जिल्ह्याला टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अशातच आता गिरणा धरणातून चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार क्यूसेक पाणी सोडले जाणार आहे. तर १४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असणार आहे. पाचवे आवर्तन जून महिन्यात सोडण्यात येणार आहे.

१३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील सर्वाधिक चार गावांत टँकरद्वारे पाणी पुरविले जात असून, १७ गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मोरगाव, रोटवद, नेरी दिगर, किन्ही (ता. जामनेर), तळबंदतांडा, हनुमंतखेडा, खेडीढोक (ता. पारोळा), वसंतवाडी (ता. भडगाव), ऐनगाव (ता. बोदवड), पिंपळगाव (ता. चाळीसगाव), रामेश्वर (ता. पाचोरा), कंडारी, कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) या गावांना १४ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. हातगाव, लोणवाडी बुद्रुक येथे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील आठ गावांमध्ये नऊ, पारोळा तालुक्यातील तीन, पाचोरा तालुक्यात चार विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. धरणगाव तालुक्यालाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत.

हेही वाचा:

Back to top button