धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड | पुढारी

धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

अमळनेर कडून बडोदाकडे जाणाऱ्या बस मधून देशी दारूची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धुळे येथील आगार प्रमुख, वाहन चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे तस्करीचा हा अनोखा प्रकार हाणून पाडण्यात आला. या कारवाई मध्ये तब्बल 700 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे मध्यवर्ती बसस्थानकात काल (दि.13) दुपारच्या सुमारास अमळनेर- बडोदा बसवरील (क्रं. एमच-२० बीएल २५३४)  एक प्रवासी हा सोबत ४ गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद स्थितीत सुरत येथे घेवून जात असल्याचे लक्षात आल्याने वाहकाने त्या बाबत आपल्या आगार व्यवस्थापकांना सांगितले. त्यांनी तत्काळ ही बस धुळे बस डेपोत घेऊन जात तिथल्या अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने बस स्थानकात ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार ज्ञानेश्वर साळुंके व पोलिस नाईक वैभव वाडीले यांना ही माहिती दिली. त्यांनी घटनेची माहिती धुळे शहर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती दिल्याने निरीक्षक आनंद कोकरे यांनी तत्काळ शोध पथकाला धुळे बस डेपोत पाठवून दारू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

तांदळाच्या गोण्यांमध्ये लपवून ठेवल्या बाटल्या

धुळे शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरत येथील प्रवाशी प्रवीण पाटील या दारू तस्कराला ताब्यात घेऊन त्याच्या सामानाची चौकशी केली. त्याने चार गोण्यांमध्ये तांदळाच्या साळमध्ये लपवून ठेवलेल्या तब्बल 700 बाटल्या या अंमळनेरहुन सुरतला विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी प्रवीण पाटील याला पोलीस ठाण्यात आणत त्याच्याकडून 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करीत असल्याची माहिती धुळे शहर पोलिसांनी यावेळी दिली. या कारवाईत पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा :

Back to top button