हास्य दिन विशेष : लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन | पुढारी

हास्य दिन विशेष : लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हास्य आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठे वैभव आहे. हास्य आपल्याला ताण-तणावापासून दूर ठेवते सकारात्मक बनविते. हास्ययोग हा सर्वोत्तम व्यायाम आहे हे पटवून देण्यासाठी संपूर्ण विश्वात दरवर्षी मे महिन्यातील पहिला रविवार हा ‘जागतिक हास्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक हास्य दिन पहिल्यांदा 1998 मध्ये मुंबईत साजरा झाला होता. हास्य चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी हास्ययोगातून उत्तम आरोग्य आनंदमय जीवन व विश्वशांती हा संदेश जगाला दिला.

आजकाल प्रचंड धावपळीत जीवन जगताना मनुष्य हसणे विसरून गेला आहे. लोकांना हसण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्यांना हसण्यासाठी प्रवृत्त करणे हादेखील हास्य दिन साजरा करण्याचा हेतू आहे. नाशिकच्या हास्य चळवळीत 28 वर्षांचा इतिहास आहे. डॉ. मदन कटारिया यांनी 13 मार्च 1995 मध्ये जगातील पहिला हास्य क्लब सुरू केला. त्याच्या दुसर्‍या वर्षी नाशिकला नंदिनी हा पहिला हास्य क्लब सुरू झाला. आज नाशिक महानगरात 115 हास्य क्लब मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी हास्याचा आनंद घेत आहेत. भारतात हजारोंच्या संख्येने हास्य क्लब सुरू आहेत. जगभरातील 120 देशांमध्ये हास्य चळवळ रुजली आहे.

आज नाशिकमध्ये गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात जागतिक हास्य दिन साजरा होत आहे. यात आरोग्यासाठी हास्याचे महत्त्व याविषयी प्रात्यक्षिके दाखवून तज्ज्ञांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी परिसरात हास्य दिंडी निघणार असून, मोठ्या संख्येने नाशिक महानगरातील हास्य क्लबचे ज्येष्ठ तरुण, पुरुष, महिला असे सर्वच मंडळी वेगवेगळ्या पोशाखात दिंडीत सहभागी होऊन हास्ययोगाचा संदेश देणार आहेत. – अ‍ॅड. वसंतराव पेखळे, अध्यक्ष, जिल्हा हास्ययोग समन्वय समिती.

हेही वाचा:

Back to top button