परभणी: येलदरी धरणात बुडून मुलाचा मृत्यू | पुढारी

परभणी: येलदरी धरणात बुडून मुलाचा मृत्यू

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : येलदरी जलाशयात वडील व मुलगा पोहण्यासाठी उतरले होते. पण पोहता पोहता 14 वर्षीय मुलगा पाण्यात बुडला. ही घटना शनिवारी (दि.६) घडली होती. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरू केला होता. अखेर मुलाचा मृतदेह आज (दि.७) सापडला. मोहन (मोण्या) कल्याणकर (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एकलव्य शाळा परिसरातील नामदेव नगर भागातील रहिवासी संजय कल्याणकार हे आपल्या कुटुंबासोबत सेनगाव-येलदरी रस्त्यावरील वन विभागाच्या उद्यानात फिरण्यासाठी गेले होते. उन्हाचा पारा चढल्याने गार्डनच्या बाजूला असलेल्या येलदरी जलाशयात संजय कल्याणकार व त्यांचा मुलगा मोहन पोहण्यासाठी उतरले होते.

दरम्यान मुलगा खोल पाण्यात गेल्याने तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. याची माहिती जिंतूर व सेनगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि ग्रामस्थांच्या वतीने बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात होता. अखेर आज जलाशयात मोहनचा मृतदेह आढळला. शहरातील वैकुंठथाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याच्या हद्दीतील वन विभागाची गार्डन पाहण्यासाठी बहुतांशी नागरिक, शालेय सहली येथे येतात. हे गार्डन येलदरी जलाशयाच्या काठावर आहे. पण दुर्दैवाने या काठावर कोणतीही सुरक्षा साधने नाहीत. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button