नाशिक : अशी ही बनवाबनवी, तोतया पत्नीद्वारे घटस्फोटाचा दावा घेतला मागे, पत्नीसह न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा | पुढारी

नाशिक : अशी ही बनवाबनवी, तोतया पत्नीद्वारे घटस्फोटाचा दावा घेतला मागे, पत्नीसह न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पती-पत्नीमधील वाद अनेकदा न्यायालयापर्यंत जातात. अशावेळी संमतीने किंवा न्यायालयातून दोघे फारकत घेतात किंवा पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात करतात. मात्र, एका पतीने लोकअदालतीत पत्नीच्या जागी दुसऱ्या महिलेस सोबत आणून ती पत्नी असल्याचे भासवून फारकतीचा दावा मागे घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित पती व अज्ञात महिलेविरोधात पत्नीसह न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द्वारका येथील ३५ वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित राहुल दत्तू सानप व अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, जिल्हा व सत्र न्यायालयात ७ मे २०२२ रोजी झालेल्या लोकअदालतीत पतीसह फारकतीचा दावा दाखल करण्यात आला होता. यात पती राहुल याने पत्नीऐवजी तोतया महिला हजर करून तीच पत्नी असल्याचे न्यायालयास भासवले. त्यानंतर बनावट दस्तऐवज सादर करीत न्यायालयात खोटा पुरावा सादर केला. लोकअदालतीत राहुलने पत्नीच्या संमतीने दावा मागे घेत पुन्हा संसार करत असल्याचे सांगितले. या दाव्यावर राहुलसह तोतया पत्नीने स्वाक्षरी करीत लोकअदालतीमार्फत निकाल घेतला. दरम्यान, हा प्रकार राहुलच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पत्नीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात पती राहुलसह अज्ञात महिलेविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button