खुशखबर! वेळेत मिळकतकर भरणार्‍यांसाठी ‘लकी ड्रॉ’ | पुढारी

खुशखबर! वेळेत मिळकतकर भरणार्‍यांसाठी ‘लकी ड्रॉ’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रामाणिकपणे मिळकत कर भरणार्‍यांसाठी महापालिकेच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यामध्ये दुचाकीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, त्यासाठी आर्थिक तरतूद केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. तसेच, वाढीव मिळकत कर भरणार्‍यांना 40 टक्के सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी ‘पीटी 3’अर्ज भरून द्यावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मिळकतकर न भरणार्‍या थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी अभय योजना राबविली जाते. मात्र, प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांसाठी कोणतीही योजना नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पहिल्या दोन महिन्यांत प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांसाठी लकी ड्रॉ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दुचाकीसह विविध आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत.

सवलतीसाठी भरावा लागणार ‘पीटी 3’अर्ज

ज्या मिळकतदारांनी एप्रिल 2018 पासून मिळकतकराची पूर्ण रक्कम भरली आहे. त्यांना चाळीस टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या कर आकारणी आणि संकलन खात्याकडे ’पीटी 3’ अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज सादर करताना सर्व पुरावे द्यावे लागणार आहेत. हा अर्ज सादर केल्यानंतरच 2018 पासूनची सवलत दिली जाईल आणि पुढील काळातही सवलत चालू राहणार आहे. परंतु हा अर्ज सादर केला नाही, तर मिळकतदार मिळकतीचा स्वत:साठी वापर करीत नसल्याचे गृहीत धरून चाळीस टक्क्यांची सवलत दिली जाणार नाही.

सर्वसाधारण करासाठी 31 जुलैपर्यंत मुदत

महापालिकेकडून आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत संपूर्ण मिळकत कर भरणार्‍यांना सर्वसाधारण करात पाच किंवा दहा टक्के सवलत दिली जाते. यंदा मिळकत कराची बिले काढण्यास उशीर झाल्याने ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Back to top button