नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव | पुढारी

नाशिक : आठवर्षीय बालिकेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, परिसरात तणाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी येथे आई-वडिलांसोबत किराणा दुकानात पायी जात असताना रस्ता ओलांडताना, मालवाहतूक करणाऱ्या छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत एका आठवर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १) दिंडोरी रोडवरील पाटाजवळील महावितरण कंपनीच्या कार्यालयालगत घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी छोटा हत्ती या वाहनाची तोडफोड करीत वाहनचालकास मारहाण केली. पंचवटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघातानंतर तासभर वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोया सलीम शेख (वय ८, रा. अवधूतवाडी, दिंडोरी रोड, पंचवटी) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. सोमवारी (दि. १) सायंकाळी पाचच्या सुमारास जोया आपले वडील सलीम शेख व आई शबनम यांच्यासोबत वज्रेश्वरीनगर येथील किराणा दुकानात दिंडोरी रोडवरून पायी चालली होती. पाटाजवळ एमएसईबी ऑफिसजवळून रस्ता ओलांडत असताना दिंडोरी नाक्याकडून तारवालानगरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या छोटा हत्ती वाहनाने (एमएच १५, एचएच ४८५८) धडक दिली. या धडकेत जोयाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी झालेल्या जोयाला ॲम्ब्युलन्समधून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शबाना फिरोज खान यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पोलिसांनी संशयित वाहनचालकास ताब्यात घेतले व याठिकाणी अपघातामुळे निर्माण झालेला तणाव शांत करीत जमावाला पांगवले. यावेळी वाहतूक कोंडी होऊन दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी नाशिकला आली…
आठवर्षीय जोया शेख इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत होती. जोया अत्यंत गुणी व हुशार असल्याने परिसरात सर्वांचीच लाडकी होती. जोयाचे वडील सलीम शेख शरदचंद्र पवार बाजार समितीत हमालीचे काम करून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरी लग्नसोहळा असल्याने बाहेरगावी गेलेली जोया दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये परतली होती.

हेही वाचा :

Back to top button