उन्हाळा संपत आला ; तरी शहर तापलेच नाही ! | पुढारी

उन्हाळा संपत आला ; तरी शहर तापलेच नाही !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दहा वर्षांत यंदा प्रथमच शहरात उन्हाळा फारसा जाणवला नाही. सतत सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमान नियंत्रित आहे. आता उन्हाळ्याचा शेवटचा महिना उजाडला. तरीही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. यंदा मार्च व एप्रिलमध्ये एकदाही उष्णतेची लाट न आल्याने यंदाचा उन्हाळा पुणेकरांसाठी पावसाळ्यासारखा आल्हाददायक ठरत आहे.

फेब्रुवारीत शहराचा पारा 40 अंशांवर गेला, मात्र संपूर्ण मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत सतत पाऊस सुरू असल्याने शहराचे कमाल तापमान 34 ते 37 अंश राहिले. त्यामुळे दहा वर्षांतील सर्वांत थंड उन्हाळा ठरला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात उष्णतेच्या दोन तर एप्रिलमध्ये तीन आणि मे मध्ये तीन तीव— लाटा आल्या होत्या, त्यामुळे शहराचा पारा 43.5 अंशांवर गेला होता. मात्र, यंदा मार्च व एप्रिलमध्ये एकही उष्णतेची लाट न आल्याने पारा 40 अंशांवर दोन ते तीन वेळाच गेला. 60 पैकी 57 दिवस तापमानाचा पारा 34 ते 37 अंशांपर्यंत स्थिर राहिला.

मे महिन्यातही पावसाचा अंदाज
मे महिना उजाडला तरी यंदा शहराचे तापमान अवघे 34 अंशांवर आहे. दुसर्‍या आठवड्यापासून वळवाच्या पावसाचे वेध लागतात, म्हणजे कडक उन्हाळा आता संपत आला आहे. मात्र, दरवर्षी जसे कडक ऊन शहरात पडते तसे यंदा झाले नाही. 7 मे पर्यंत शहरात ढगाळ वातावरण अन् सायंकाळी पावसाच अंदाज दिल्याने मे महिन्यातही आल्हाददायक वातावरण आहे.

यंदा बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातून राज्यात सतत वारे वाहत आहे. बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त तर अरबी समुद्राकडून दमट वारे वाहत असल्याने त्या वार्‍यांची टक्कर होऊन ढगांच्या निर्मतिीचे प्रमाण वाढले, त्यामुळे भर उन्हाळ्यात सतत पाऊस सुरू आहे. शहराच्या कमाल तापमानात त्यामुळे सतत घट झाल्याने असा प्रकार झाला.
– डॉ. के. एस. होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान विभाग, पुणे

शहराच्या तापमानात 3 अंशांनी घट
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या हालचाली सुरू होताच शहरावर ढगांची गर्दी होत आहे. मंगळवारी दुपारी 3 नंतर अचानक आभाळ ढगांनी भरून आले. गार वारे सुटले. काही भागात हलका पाऊस झाला, त्यामुळे शहराचे कमाल तापमान 3 वरून 33 अंशांवर खाली आले आहे.

मागच्या वर्षी रेकॉर्डब्रेक तापमान
(27 एप्रिल 2022) (अंश सेल्सिअसमध्ये)
कोरेगाव पार्क : 44.1
पिंपरी चिंचवड : 43.6
लवळे : 42.7
मगरपट्टा : 42.6
एनडीए परिसर : 42.1
शिवाजीनगर ः 42
पाषाण : 41

यंदा मार्चमधील स्थिती
पाऊस : 34.5 मि. मी. (79 टक्के जास्त)
महिनाभर सरासरी तापमान 36 ते 37 अंश
आर्द्रता : सतत 55 ते 60 टक्के

यंदा एप्रिलमधील स्थिती
पाऊस : 18.7 मि. मी. (44 टक्के जास्त)
तापमान : 36 ते 38 अंश
आर्द्रता : 55 ते 60 टक्के

Back to top button