नाशिक जिल्ह्यात १५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू...पाहा कुठे-कुठे ते | पुढारी

नाशिक जिल्ह्यात १५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू...पाहा कुठे-कुठे ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार पद्धती राबविण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकूण १५ ठिकाणी हा दवाखाना सुरू झाला आहे. या दवाखाना संकल्पनेचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे करताना ते बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील १३ तालुके आणि दोन महापालिका क्षेत्रांत जुन्या शासकीय जागांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू झाला आहे. आपला दवाखानासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून नुकत्याच १३ एमबीबीएस दर्जाच्या डॉक्टरांची मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येत आहे. प्रत्येक ‘आपला दवाखाना’ मध्ये एक डॉक्टर, एक नर्स रुग्णांच्या सेवेत असेल. दररोज दुपारी २ ते रात्री १० या वेळेत हा दवाखाना सुरू राहणार आहे.

जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यावरील सर्वसाधारण रुग्णांचा भार हलका करण्यासाठी आपला दवाखाना ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित केली आहे. ‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत बाह्य रुग्णसेवा मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी उपचार सर्वांसाठी मोफत करण्यात येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील आपला दवाखानाची ठिकाणे

१. नाशिक महानगरपालिका, म्हाडा, चुंचाळे अंबड गाव, ता. नाशिक.

२. बागलाण नगरपंचायत, आपला दवाखाना, ता. बागलाण.

३. चांदवड नगरपंचायत, जुनी तहसील कार्यालय, ता. चांदवड.

४. देवळा नगरपंचायत, उपकेंद्र देवळा २ ता. देवळा.

५. दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी उपकेंद्र १ ता. दिंडोरी.

६. इगतपुरी नगरपंचायत, उपकेंद्र गिरणारे.

७. कळवण नगरपंचायत, उपकेंद्र कळवण ३ ता. कळवण.

८. मालेगाव महानगरपालिका, रमजानपुरा उपकेंद्र १ ता. मालेगाव.

९. नांदगाव कौन्सिल नगर परिषद, समाज मंदिर, बाबासाहेब आंबेडकर चौक.

१०. निफाड नगरपंचायत, उपकेंद्र निफाड २, ता. निफाङ

११. पेठ नगरपंचायत, जुना नगरपंचायत हॉल, पेठ, ता. पेठ.

१२. सिन्नर नगरपंचायत, जुना नगरपालिका दवाखाना, ता. सिन्नर.

१३. सुरगाणा नगरपंचायत, जुना तहसीलदार क्वॉटर, पोस्ट ऑफिस सुरगाणा, ता. सुरगाणा.

१४. त्र्यंबकेश्वर नगरपंचायत, त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय, वाचा भवन, ता. त्र्यंबकेश्वर.

१५. येवला नगरपंचायत, व्यायमशाळा वल्लभनगर मारुती मंदिर जवळ, ता. येवला.

हेही वाचा :

Back to top button