चीनची वाढती ढवळाढवळ! | पुढारी

चीनची वाढती ढवळाढवळ!

शेजारी देशांना सातत्याने त्रास देणारा आणि आशिया, आफ्रिका खंडांत ब्रिटिशांप्रमाणे वसाहती स्थापन करू पाहणार्‍या चीनचे संरक्षणमंत्री ली शांघ फू यांनी नुकताच भारताचा दौरा केला. लडाखमधील गलवानच्या खोर्‍यात तीन वर्षांआधी चीनने केलेली आगळीक कोणताही भारतीय नागरिक विसरू शकलेला नाही. आपल्या सैनिकांनी त्यावेळी अतुलनीय पराक्रम दाखवून चिन्यांचा डाव हाणून पाडला होता.

गलवानच्या त्या हिंसक घटनेनंतर दोन्ही देशांदरम्यानचा तणाव पराकोटीला पोहोचला होता. हा तणाव आता काही प्रमाणात निवळला असला, तरी चीनपासून असलेला धोका कमी झालेला नाही. किंबहुना चीनपासून भारताला सततचा धोका आहे, असेच प्रकर्षाने म्हणावे लागेल. शांघ फू यांच्या दौर्‍यातून फार काही निष्पन्न होण्याची शक्यता नव्हती आणि झालेही तसेच. दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चीनपासून सावधानता बाळगणे, हेच भारताच्या द़ृष्टीने संयुक्तिक ठरणार आहे. शांघाय को-ऑपरेशन संघटनेच्या बैठकीचे औचित्य साधत चीनसह इतर काही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीचा दौरा केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची शांघ फू यांच्यासोबत द्विपक्षीय विषयांवर चर्चा झाली. बैठकस्थळी आगमन झाल्यानंतर सिंह यांनी शांघ फू यांच्याशी हस्तांदोलन करणे टाळले. त्यावेळच्या सिंह यांच्या ‘बॉडी लँग्वेज’ ची बरीच चर्चा झाली. गलवानची घटना घडल्याच्या काही महिन्यांतच सिंह यांची चीनच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांशी एका परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर दोन देशांचे संरक्षणमंत्री पहिल्यांदाच भेटत असल्याने गेल्या आठवड्यातील भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झाले होते.

सीमेवर शांतता आणि स्थैर्य स्थापन झाल्याशिवाय सौदार्हाचे संबंध निर्माण होणार नाहीत, असा रोखठोक संदेश सिंह यांनी शांघ फू यांना दिला. ‘वादाचे विषय शस्त्रांच्या नव्हे, तर चर्चेच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात,’ असे भारताकडून यावेळी सांगण्यात आले. वास्तविक विस्तारवादी चीनला सीमेवरील तणाव कमी करण्यात कोणतेही स्वारस्य नाही, हे मागील काही वर्षांतील घडामोडींवरून स्पष्ट झालेले आहे. डोकलाम असो वा अरुणाचल प्रदेशातील तवांग असो… सतत काही ना काही वाद उकरत भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो. सीमेपलीकडील भागात चीन मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासाची कामे करीत आहे, तर हायब—ीड गावांची निर्मितीदेखील करीत आहे. अशा परिस्थितीत भारतालासुद्धा आपल्या सीमाभागात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे.

जागतिक पटलाचा विचार केला, तर जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि युरोपियन देशांच्या मदतीने चीनची कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे; पण या प्रयत्नांना अजूनतरी पुरते यश मिळालेले नाही. आशिया-प्रशांत क्षेत्रातील चीनची मुजोरी रोखण्यासाठी ‘क्वाड’ संघटनेची स्थापनाही करण्यात आलेली आहे. व्यापाराच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशांवर चीनची सर्वत्र मुजोरी सुरू आहे, हे लपून राहिलेले नाही.
व्यापार – उद्योग क्षेत्रांत भारत मोठी झेप घेऊ शकतो, याची जाणीव असल्याने चीनचा जळफळाट सुरू आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे वारंवार चीनला आरसा दाखवून देत असतात. सीमा व्यवस्थापनासंदर्भातील करारांचे चीनकडून पालन होत नसल्यानेच दोन देशांदरम्यानचे संबंध अस्थिर बनले असल्याचे व कधीही काहीही होऊ शकते, असे जयशंकर यांचे रोखठोक म्हणणे आहे.

पाकिस्तान, श्रीलंकेसह अन्य काही देशांच्या दिवाळखोरीमागे निव्वळ चीन आहे. आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश चीनच्या नादाला पुरते लागले आहेत. जगाला कोरोनाची भयंकर देणगी दिल्यानंतर चीन जगाच्या नजरेतून उतरला होता. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यानंतर चीनमधून काढता पाय घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, असे असूनही जागतिक पातळीवर आपणच कशी महासत्ता आहोत, हे दाखविण्याचा शी जिनपिंग यांचा आटोकाट प्रयत्न सुरूच आहे. आखातामधील सौदी अरेबिया आणि इराण या देशांदरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीनने पुढाकार घेतला होता. यायोगे आता गल्फमधील चीनची ढवळाढवळ वाढली, तर आश्चर्य वाटता कामा नये. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आपण तटस्थ आहोत, असे चीन दाखवित असला, तरी प्रत्यक्षात चीनकडून रशियाला रसद पुरवली जात आहे. पश्चिम युरोपच्या मानाने पूर्व युरोपमध्ये तितकी समृद्धी नाही. त्यामुळे पूर्व युरोपियन देशातही चीनने जाळे पसरण्यास सुरुवात केली आहे. चीनची वाढती महत्त्वाकांक्षा एकप्रकारे अमेरिकेच्या जागतिक महासत्ता असण्याला थेट आव्हान देऊ पाहत आहे. यातूनच अमेरिका आणि चीनदरम्यान ‘तू-तू, मैं-मैं’ वाढली आहे. तैवानच्या निमित्ताने भविष्यात या उद्रेकाचा स्फोट झाला, तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत.

ना – पाक धमक्या…

पाकिस्तान गर्तेत गेला असला आणि तिथली जनता भिकेला लागलेली असली, तरी भारताला धमकाविण्याची पाक लष्करी अधिकार्‍यांची सवय काही सुटायला तयार नाही. ‘भारताकडून आगळीक झाल्यास आमचे लष्कर भारतात घुसून त्याचे प्रत्युत्तर देईल,’ अशी दर्पोक्ती पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. पाक लष्कराचे टँक काही कामाचे नाहीत आणि त्यांच्यासाठी पुरेसे डिझेलही उपलब्ध नाही, असे खळबळजनक विधान तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी काही दिवसांपूर्वी 25 पेक्षा जास्त पत्रकारांसमोर केले होते. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी ही दर्पोक्ती केली आहे. एससीओ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे 4-5 मे रोजी भारतात येत आहेत; पण त्यांच्या या दौर्‍यातूनही फार काही घडण्यची अपेक्षा नाही.

– श्रीराम जोशी

Back to top button