नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा | पुढारी

नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मोडकळीस आलेल्या वाड्यांचा प्रश्न दरवर्षीच उद्भवत असून, वारंवार नोटिसा बजावूनही वाडा मालकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे यंदाही महापालिका प्रशासनाने तब्बल एक हजार १८६ वाड्यांना नोटिसा बजावल्या असून, पावसाळ्यापूर्वीच वाडे खाली करण्याचा इशारा दिला आहे. तसेच वाडा खाली न केल्यास वीज आणि नळकनेक्शन तोडले जाणार आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर सोपविली असून, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

तीन महिन्यांपूर्वी अशोकस्तंभ येथे कारच्या धडकेत वाडा कोसळल्याने जुन्या व जीर्ण वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी धोकादायक वाडे पोलिस बंदोबस्तात खाली करणे व त्यांचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याची जबाबदारी विभागीय अधिकार्‍यांवर सोपवली होती. पण, बहुतांश वाडे हे राजकीय प्रतिनिधींच्या ताब्यात असून, विभागीय अधिकारी कारवाईस कचरत आहेत. आता पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी सहा विभागांत धोकादायक वाडे खाली करण्यासाठी मोहीम आखली आहे.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक अशा एक हजार १८६ वाड्यांना नोटिसा धाडल्या जाणार आहेत. पण नेहमीचा अनुभव पाहता या नोटिसा देऊन पुढे काहीही होत नाही. या नोटिसांना वाड्यातील रहिवासी जुमानत नाहीत. यामुळे नोटिसा धाडूनही वाडे खाली न केल्यास त्या विभागातील विभागीय अधिकाऱ्यांना संबंधितांचे पाणी व वीजकनेक्शन तोडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी वाडा मालक व भाडेकरू यांच्यात वाद असल्याने भाडेकरूने वाडा खाली करत नाहीत. अशोकस्तंभ येथे वाहनाच्या धडकेत वाडा कोसळल्याने जुन्या वाड्यांची सुरक्षितता चिंतेचा विषय आहे.

शहरातील काही धोकादायक वाडे

नाशिक : घनकर लेन
नाशिक : जुनी तांबट लेन
नाशिक : डिंगर आळी
नाशिक : तिवंदा चौक

सर्व फोटो : हेमंत घोरपडे

हेही वाचा :

Back to top button