Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई | पुढारी

Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी (दि. २६) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडे अधिकृत दौरा प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये दौऱ्याची लगीनघाई सुरू झाली आहे. राज्यपाल बैस हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन, पहिने तालुका त्र्यंबकेश्वर या आदिवासी गावास भेट, कालिदास कलामंदिर, सार्वजनिक वाचनालय व काळाराम मंदिर या ठिकाणी दौऱ्यावर येत आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल हे पहिने गावातील अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेने साकारलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण येथे करण्यात येणार आहे. यामध्ये युरिन टेस्ट किट, पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात हेल्थ कार्ड वितरीत केले जाणार आहे. सोबतच मॉडेल स्कूल, सुपर ५० यांसारख्या प्रकल्पांचेही सादरीकरण केले जाणार आहे.

पाच प्रकारच्या चाचण्यांचे अवघ्या ३० सेकंदांत अहवाल प्राप्त होतात, अशा टेस्टिंग किटमध्ये ‘वेलनेस केअर किट’, ‘युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन’, ‘मॅटर्निटी वेलनेस किट’, ‘एल्डरली केअर किट’ आणि ‘किडनी केअर किट’ असे पाच प्रकार आहेत. निओडॉक्स या स्टार्टअपने हे किट सादर केले आहे. या किटच्या माध्यमातून यकृत, फुफ्फुस, युरिनरी ट्रॅकसारख्या महत्त्वाच्या अवयवांचा तपशील अवघ्या ३० सेकंदांत कळणार आहे. युरिन स्ट्रिप्स मोबाइलसमोर स्कॅन केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांत मोबाइलवर चाचणीचा निकाल हाती येतो. यासोबतच जिल्हा परिषदेने आकारास आणलेल्या १०० मॉडेल स्कूलचे, परीक्षेच्या माध्यमातून निवड केलेले सुपर ५० विद्यार्थी आदी संकल्पनांचे सादरीकरण यात केले जाणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button