तहसीलदारांनी शेतकर्‍यांचे पेरु वाटप आंदोलन चिरडले, अर्वाच्च भाषेचा वापर करीत पेरू फेकले

तहसीलदारांनी शेतकर्‍यांचे पेरु वाटप आंदोलन चिरडले, अर्वाच्च भाषेचा वापर करीत पेरू फेकले

पारनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: शिवपाणंद शेतरस्त्यांसाठी शेतकर्‍यांनी सुरू केलेले पेरू वाटप आंदोलन तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी मोडून काढले. शेतकर्‍यांना अर्वाच्च भाषेचा वापर करत आपली निष्क्रियता लपविण्यासाठी व मर्यादेचे उल्लंघन करत कर्मचार्‍यांना ओरडत बॅनर फाडला. शेतकर्‍यांचे पेरू फेकून दिले. पारनेर तहसील कार्यालयात सोमवारी हा प्रकार घडला.

शिव पाणंद शेतरस्त्यांच्या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांकडून सप्तपदी अभियानांतर्गत गोळा केलेल्या अर्जांवर काम होत नसल्याने त्यांनी तहसील कार्यालयासमोर पेरू वाटत आंदोलन सुरू केले. तहसीलदार आवळकंठे यांनी हे आंदोलन दडपण्यासाठी शेतकर्‍यांचे पेरू फेकून देत, त्यांना अर्वाच्च भाषेचा वापर केला. हा त्यांच्या पदाला शोभणारा नाही. त्यांच्याकडून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला झाला. तो वरिष्ठ अधिकार्‍यासह, लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने घेऊन आपण जनतेचे सेवक आहोत याची जाणीव करून द्यायला हवी, अशी खरमरीत टीका सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केली.

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या तालुक्यात पाणंद शेतरस्त्यांसह पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करत विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती झाली. राज्यात शिवपाणंद रस्त्यांसह, पाझर तलावांच्या शासन निर्णयात मोठे बदल करण्यात आले. त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेतरस्ते खुले होताना दिसत आहेत.

जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून सप्तपदी अभियान राबविण्यात आले. त्यात पारनेर तालुक्यातून शेतरस्त्यांसाठी सर्वांत जास्त अर्ज करण्यात आले. यासाठी शेतकर्‍यांनी प्रशासनाला मोठे सहकार्य केले. परंतु, रस्त्याच्या कामांना मात्र केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

त्यामुळे पारनेर तहसीलला पेरू वाटप आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र, या निवेदनाची तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे शेतरस्ते पीडित शेतकर्‍यांनी पेरू वाटप आंदोलन सुरू केले. यावेळी तहसीलदारांनी अर्वाच्च भाषेचा वापर करून, बॅनर फाडत, शेतकर्‍याचे पेरू फेकून देत आंदोलन मोडून काढले. हा संविधानाचा अपमान आहे.

असे मग्रूर अधिकारी लोकशाहीला घातक असून, लवकरच यांची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करून जिल्हा स्तरावरून प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले. यावेळी दशरथ वाळूंज, बाळासाहेब दळवी, रामदास लोणकर, बाळसाहेब औटी, विठ्ठल लोणकर, बाळासाहेब जाधव, हौशिराम कुदळे, प्रशांत खैरे, शंकर खैरे, संपत जाधव, गणेश कुदळे आदींसह मोठ्या संख्येने शेतरस्ते पीडित शेतकरी उपस्थित होते.

शिवरस्ते खुले करण्याबाबत निवेदन देऊन शेतकरी आंदोलन करत असताना, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची अरेरावीची भाषा तहसीलदार आवळकंठे यांनी केली. त्यांनी आंदोलनाला आणलेले पेरू गेटबाहेर फेकून देण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

तुरूंगात टाकण्याची धमकी

संबंधित शेतकर्‍यांनी आंदोलनासंदर्भात निवेदन दिले होते. शांततेच्या मार्गाने पेरू वाटप आंदोलन तहसील कार्यालयात सुरू असताना तहसीलदार आवळकंठे यांनी आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला. येथे तमाशा घालायचा नाही. 144 कलम सुरू असून, त्या अनुषंगाने आतमध्ये टाकण्याची धमकी शेतकर्‍यांना दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news