नाशिक : एसटीपीच्या नूतनीकरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल | पुढारी

नाशिक : एसटीपीच्या नूतनीकरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तपोवन व आगरटाकळी या दोन मलजल शुद्धीकरण प्रकल्पांचे केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या डीपीआरला राज्य शासनाने तांत्रिक मान्यता दिली आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत गंगापूर येथील मलजलशुद्धीकरण प्रकल्पाचेदेखील नूतनीकरण केले जाणार आहे. त्याकरिता 49 कोटींचा निधीदेखील मंजूर झाला आहे. लवकरच निविदाप्रक्रिया राबवत कामाचा श्रीगणेशा केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असून, महापालिका प्रशासनाकडून पायाभूत सुविधांसह महत्त्वाच्या विकासकामांचा आराखडा तयार केला जात आहे. त्यात ‘नमामि गोदा’ प्रकल्प, पाणीपुरवठा योजना व मलजल शुद्धीकरण प्रकल्प हे महत्त्वाचे आहेत. शहरात एकूण 11 मलजलशुद्धीकरण केंद्रे असून, त्यापैकी नऊ केंद्रांचे नूतनीकरण केले जाईल. केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेअंतर्गत शहरात नव्याने दोन मलजलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे व जुन्या प्रकल्पांचे नूतनीकरण करणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्यास केंद्राने महापालिकेला तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे 400 कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. त्याअंतर्गत मनपाने तपोवन व टाकळी आगार येथील मलजलशुद्धीकरण प्रकल्पाचा डीपीआर मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. तपोवन मलजलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 166 कोटी व टाकळीसाठी 138 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यात या दोन्ही केंद्रांचे नूतनीकरण करून त्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. येणार्‍या सिंहस्थापूर्वी निविदाप्रक्रिया राबवत नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

गंगापूर एसटीपीसाठी पुढील आठवड्यात निविदा
पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेत शहरातील गंगापूर येथील मलजलशुद्धीकरण प्रकल्प नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या केंद्राची क्षमता दिवसाला 18 वरून 30 एमएलडी इतकी वाढवली जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button