नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई | पुढारी

नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिसांतील वादग्रस्त ठरलेला अंमलदार मयूर हजारी याला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बडतर्फ केले आहे. मयूरविरोधात दमदाटी करून पैसे घेतल्याबद्दल तक्रार आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तो दोषी आढळला होता. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

मयूर अपरसिंह हजारी असे बडतर्फ केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. तो 10 वर्षांपूर्वी शहर पोलिस दलात भरती झाला होता. मात्र त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्याची मुख्यालयात नेमणूक होती तसेच तो निलंबित होता. गतवर्षी तपोवन परिसरात निफाडमधील एका कृषी औषधविक्रेत्याला अडवून त्याला दमदाटी करीत साडेतीन लाख रुपये घेतल्याचा आरोप मयूरवर होता. कोणतीही कायदेशीर कारवाई न करता धमकावून हे पैसे घेतले. या प्रकरणी तक्रारदाराने मयूरविरोधात पोलिस आयुक्तालयात लेखी तक्रार केली होती. आस्थापना विभागातर्फे खातेअंतर्गत चौकशीत त्याने गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केल्याचे समोर आले होते. त्यावरून शिंदे यांनी ही कठोर कारवाई केली आहे.

‘बेअरर चेक’द्वारे घेतले पैसे
तक्रारदार दि. 22 नोव्हेंबर 2022 रोजी जनार्दनस्वामी आश्रमाजवळ त्यांच्या कारमध्ये थांबलेले होते. कारमध्ये कृषी औषधांचा साठा होता. तिथे मयूर हजारी तीन साथीदारांसह पोहोचला. तक्रारदारांना अडवून ‘तुमच्यावर गुन्हा दाखल करू’ अशी धमकी देत दमदाटी केली होती. यासह अप्रामाणिक व अशासकीय हेतूने मयूरने तक्रारदाराकडून तीन लाख रुपये व एका ‘बेअरर चेक’द्वारे 45 हजार रुपये खासगी बँकेतून घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा:

Back to top button