Blue Hole : पृथ्वीवरील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात खोल ‘ब्ल्यू होल’चा शोध | पुढारी

Blue Hole : पृथ्वीवरील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात खोल ‘ब्ल्यू होल’चा शोध

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमधील युकाटन पेनिन्सुलाच्या किनारपट्टीलगत जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात खोल ‘ब्ल्यू होल’चा अपघातानेच शोध लागला आहे. चेटुमल बेजवळ समुद्रात हे खोल विवर आहे. ते 900 फूट (274 मीटर) खोल असून, त्याचा विस्तार 1,47,000 चौरस फुटांच्या जागेत आहे.

सध्या जगातील सर्वात खोल ‘ब्ल्यूू होल’ म्हणून दक्षिण चीन समुद्रातील ‘ड्रॅगन होल’ची ख्याती आहे. हे विवर 980 फूट खोलीचे आहे. ‘ब्ल्यूू होल’मध्ये समुद्रातील उभ्या स्थितीत असलेल्या खोल गुहा असतात ज्या किनारपट्टीलगतच्या भागात आढळतात. एखाद्या स्तंभासारख्या खोल असलेल्या या गुहा किंवा सिंकहोल त्यामधील निळ्या पाण्यामुळे ‘ब्ल्यूू होल’ म्हणून ओळखल्या जातात. अशा अनेक गुहांमध्ये जलवनस्पती आणि सागरी जीवांचे मोठे वैविध्य आढळते. त्यामध्ये प्रवाळे, सागरी कासवं आणि शार्क माशांचाही समावेश आहे. चेटुमल येथील या ब्ल्यूू होलला ‘ताम जा’ असे नाव दिले आहे.

हा माया संस्कृतीमधील एक शब्द असून त्याचा अर्थ ‘खोल पाणी’ असा होतो. या ‘ब्ल्यूू होल’च्या कडा सुमारे 80 अंशाच्या आहेत. त्याचे मुख समुद्राच्या पृष्ठभागापासून 15 फूट खोलीवर आहे. खरे तर याचा शोध 2021 मध्येच लावण्यात आला होता व त्याबाबत तपशीलवार संशोधन सुरू होते. ‘एल कोलेजियो डी ला फ्राँटेरा सूर’ या सार्वजनिक संशोधन केंद्रातील संशोधकांनी मेक्सिकोच्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने हा शोध लावला होता. त्याबाबतची माहिती ‘फ्रंटियर्स इन मरीन सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यावेळी चूनखडीच्या दगडांवर समुद्राच्या पाण्याचा परिणाम होतो त्यावेळी अशी विवरे बनतात.

Back to top button