नाशिक : ईदसाठी शीरखुर्मा साहित्य खरेदीला उधाण | पुढारी

नाशिक : ईदसाठी शीरखुर्मा साहित्य खरेदीला उधाण

नाशिक (जुने नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शुक्रवारी चंद्रदर्शन घडल्यास शनिवारी ईद-उल-फित्र साजरी होणार आहे. यानिमित्ताने खास ईदच्या दिवशी तयार करण्यात येणर्‍या शीरखुर्म्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीला उधाण आले आहे. ईद दोन दिवसांवर आली असून, बाजार फुलला आहे.

शुक्रवारी रमजानचे 29 रोजे पूर्ण होत आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तवली जाते, असे झाल्यास शनिवारी ईद साजरी होईल. म्हणून ईदच्या तयारीला वेग आल्याचे चित्र आहे. शहीद अब्दुल हमीद चौक दूध बाजारपासून भद्रकाली मार्केट, सिंधी कापड मार्केट, गाडगे महाराज पुतळा परिसर, मेनरोड, दहीपूल, जिजामाता दवाखाना परिसरासोबत आदी ठिकाणी ईदच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. ईदच्या दिवशी घराघरांत तयार करण्यात येणारा खास पदार्थ म्हणजे शीरखुर्मा. शीरखुर्म्यासाठी लागणारे काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, खोबरे, खसखस इत्यादी वर्षभर उपलब्ध असतात. परंतु ईदवेळी मागणी असल्याने तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने लावली जातात. या दुकानांमध्ये प्रचंड पातळीवर फक्त शिरखुर्म्यासाठी लागणारे पदार्थ विक्री होतात.

सामग्रीचे दर (प्रतिकिलो)
काजू : 800, बदाम : 800, पिस्ता :2,400, किसमिस : 300, चारोळी : 1,600, खसखस:1,800, खजूर(खारीक): 340, राजापुरी खोबरा: 125, शेवई: 100, प्रती पाकीट, केशर: 200 प्रतिग्रॅम.

फक्त ईदच्या काळात शीरखुर्म्यासाठी लागणारी सामग्री विकण्याचा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. ईदजवळ आल्यामुळे रंगीबेरंगी सुतरफेणी व शीरखुर्मा सामग्रीची मागणी प्रचंड वाढली आहे. यंदा वस्तूंच्या किंमत वाढल्याचा परिणाम दिसून येत आहे. – एहतेशाम सय्यद, ड्रायफ्रूट विक्रेता.

हेही वाचा:

Back to top button