नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा | पुढारी

नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दातीर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदावरून मुक्त करण्याचे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. तसेच पदाचा राजीनामा दिला असला तरी मनसैनिक म्हणून मनसेतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी म्हटले आहे की, आपण माझ्यावर विश्वास टाकून पक्षात मला नाशिक पश्चिमची विधानसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांसारखी मानाची पदे दिलीत. या पदांना मी माझ्या पूर्ण क्षमतेने, शंभर टक्क्यांपेक्षा अधिकच देण्याचा प्रयत्न केला आहे.  वेळोवेळी आपण माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत मला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन देत आले आहात. आपण मला जे प्रेम, आपुलकी व जिव्हाळा दिला आहे. त्यामुळे मी अत्यंत भारावून गेलो आहे. तरी सध्या माझ्याकडे असलेल्या पदास पूर्ण न्याय देऊ शकत नसेल तर या पदावर राहण्याचा मला काही एक अधिकार नाही असे मला वाटते. तरी आपणांस अत्यंत विनम्रपणे दरखास्त करतो की, आपण मला माझ्या शहराध्यक्ष पदावरून पदमुक्त करावे. तसेच ह्यापुढेही मी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आपणांस कायम बांधील राहील, तसेच पक्षहितासाठी सदैव माझ्या पूर्ण क्षमतेने झटत राहील असे दातीर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. दातीर यांच्या या राजीनाम्यानंतर नाशिकमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मनसेतील अंतर्गत गटबाजीतून दातीर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा : 

Back to top button