पुणे : जूनला सुरू होणार पहिली मध्यवर्ती समूह शाळा | पुढारी

पुणे : जूनला सुरू होणार पहिली मध्यवर्ती समूह शाळा

दत्ता नलावडे :

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील पानशेत व वरसगाव धरण खोर्‍यातील अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी पानशेत येथे सुरू होणार्‍या राज्यातील पहिल्या मध्यवर्ती समूह शाळेचा मार्ग मोकळा झाला आहे. खेड्यापाड्यातील पालकांनी समूह शाळेत विद्यार्थ्यांना दाखल करण्यास संमती दिली आहे. जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ही शाळा सुरू होणार आहे. समूह शाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. यासाठी कुरण बुद्रुक, वरचीवाडी, मधलीवाडी, वरसगाव, देशमुखवाडी, पडाळवाडी, सुतारवाडी, कुरण खुर्द, कादवे, शिर्केवाडी, चिमकोडी, वडघर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द आदी ठिकाणी पालक मेळावे आयोजित करण्यात आले होते.

पानशेत धरण भागातील खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत पटसंख्या कमी झाली आहे. बहुतेक शाळांत एक ते पंधरा विद्यार्थी आहेत. एक दोन, तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक आहेत. अतिदुर्गम भागात येण्यास शिक्षकही नाखुष आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरली आहे.

दुर्गम खेड्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मध्यवर्ती समूह शाळेचा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांना विषयानुसार शिक्षक, संगीत व इतर कला, स्पर्धा परीक्षा, खेळांसाठी स्वतंत्र शिक्षक, संगणक कक्ष व प्रयोगशाळा तसेच विद्यार्थ्यांना घरापर्यंत ये-जा करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात येणार आहे.

वेल्हे तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पकंज शेळके व नलावडे यांनी पालकांच्या अडचणी, समजावून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या हितासाठी समूह शाळा सुरू होत असून, त्यामुळे सक्षम भावी पिढी घडणार आहे, असे शेळके
यांनी सांगितले. नलावडे म्हणाले, समूह शाळेत सर्व सुविधा मोफत आहेत. सध्या विद्यार्थ्यांना 8 वीपर्यंत शिक्षण दिले जाणार आहे.

दीड कोटीची इमारत
जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने दीड कोटी रुपये खर्च करून पानशेत येथे समूह शाळेची प्रशस्त इमारत उभारण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे या वर्षी 1 जानेवारी रोजी शाळा सुरू झाली नाही. मात्र, पालकांनी संमती दिल्याने जूनमध्ये शाळा सुरू होणार आहे.

Back to top button