

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विकास सोसायटी मतदारसंघ गटातून बाजार समितीचे तत्कालीन तीन माजी सभापती आणि एका संचालकांनी भरलेले उमेदवारी अर्ज मंजूर करण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या आदेशास पणन संचालकांकडे आव्हान देण्यात आले आहे. त्याप्रश्नी पणन संचालकांनी येत्या सोमवारी (दि.17) दुपारी एक वाजता सुनावणी ठेवली आहे. बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्याकडे चंद्रकांत गोविंद वारघडे (बकोरी, ता. हवेली) यांनी बाजार समितीचे माजी सभापती व निवडणुकीतील उमेदवार दिलीप काळभोर (लोणी काळभोर), प्रकाश जगताप (जगताप वस्ती, आष्टारपूर), रोहिदास उंंद्रे (मांजरी खुर्द) आणि माजी संचालक राजाराम कांचन (उरुळी कांचन) यांचे दाखल उमेदवारी अर्ज अपात्र करण्यासाठी अपील केले होते.
त्यामध्ये म्हटले होते की, पुणे बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाचे 1 ऑक्टोबर 1999 ते 19 ऑगस्ट 2002 या कार्य कालावधीतील कामकाजाची चौकशी करण्यासाठी पणन संचालकांनी मे. मुलाणी आणि कंपनीची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या चौकशी अहवालानुसार त्या कालावधीत 8 कोटी 66 लाख 50 हजार इतक्या रकमेचा आर्थिक तोटा झाला. त्या आर्थिक तोट्याला 21 संचालक जबाबदार होते. ही रक्कम विभागल्यास प्रत्येक संचालकानुसार 41 लाख 26 हजार 190 रुपयांच्या रकमेस ते जबाबदार होते आणि अहवाल अस्तित्वात असल्याने बाजार समिती कायद्यानुसार ते अपात्र ठरतात.
वादी वारघडे व प्रतिवादींनी आपापली बाजू मांडली. त्यातील निष्कर्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकार्यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हा उपनिबंधकांनी 8 मार्च 2022 रोजीच्या कायद्यान्वये संबंधित संचालकांना नोटीस काढल्या. त्यास पणनमंत्र्यांकडे अपिल क्रमांक 10/2023 दाखल केले असता त्यांनी 8 मार्च 2022 रोजीच्या नोटीसविरुध्द पुढील सुनावणी होईपर्यंत अंतरीम स्थगिती आदेश पारित केले आहेत व या प्रकरणी पुढील सुनावणी 12 एप्रिल 2023 रोजी ठेवण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज 5 एप्रिलच्या आदेशान्वये मंजूर केलेले आहेत.