नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक | पुढारी

नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि.८) पाणी टंचाई आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत नाशिक शहरामधील पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

देशापुढे यंदा अलनिनोचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी ऑगस्टपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. तसेच त्याचे प्रमाण हे जेमतेम राहण्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे शासनाने आतापासून अलनिनोच्या संकटाला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली. जिल्हानिहाय संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करताना त्याच्या वापराबाबत काटकसरीच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यानूसार येत्या मंगळवारी (दि.१२) राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हानिहाय टंचाई उपाययोजनांबद्दलची बैठक बोलविली आहे. या बैठकीपूर्वीच पालकमंत्री भुसे हे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता टंचाई कृती आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत धरणांमधील उपलब्ध जलसाठा, नागरिकांमध्ये पाणी वापराबाबत जनजागृती तसेच अन्य बाबींवर विचारमंथन होणार आहे. दरम्यान, संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर तसेच गंगापूर धरणातील उपयुक्त साठा विचारात घेता नाशिक महापालिकेने शहरामध्ये आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावच राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. महापालिकेच्या या प्रस्तावावर बैठकीत चर्चा होऊन अतिमत: शहरात आठवड्यातील एक दिवस पाणी कपात लागू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांच्या नजरा बैठकीकडे लागलेल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button