जलपर्णीमुक्त तलावासाठी प्रकल्प; कात्रज, पाषाण, जांभुळवाडी तलावांचा समावेश | पुढारी

जलपर्णीमुक्त तलावासाठी प्रकल्प; कात्रज, पाषाण, जांभुळवाडी तलावांचा समावेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जलपर्णीच्या विळख्यातून तलावाची मुक्तता करण्यासाठी महापालिकेकडून कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलावाजवळ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येणार आहे. शहराच्या वैभवात भर घालणार्‍या आणि जैवविविधता टिकविण्यास हातभार लावणार्‍या कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलावाला जोडणार्‍या नाले तसेच ओढ्यांंमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता थेट सांडपाणी मिसळते. परिणामी, तलावांचे पाणी प्रदूषित होत असून, तलावांमध्ये वर्षभर पर्यावरणास हानिकारक असलेल्या जलपर्णीचा विळखा पडतो. ही जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी अडीच ते तीन कोटींचा खर्च केला जातो.

हे तीनही तलाव कायमस्वरूपी जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी महापालिकेने तलावाच्या परिसरातच सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे 6 कोटींचा खर्च येणार असून, केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून प्रशासनाने याबाबतचे कामही सुरू केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.
या शिवाय केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयांच्या तलाव सुशोभीकरण प्रकल्पात या तिन्ही तलावांचा समावेश असून, हा प्रस्ताव मान्य झाल्यास हे तलाव पूर्णत: सुशोभित केले जाणार असल्याचेही डॉ. खेमणार यांनी सांगितले.

शहरातील या तिन्ही तलावांमध्ये दिवसाला प्रत्येकी 20 लिटर (2 एमएलडी) सांडपाणी प्रक्रियेची क्षमता असलेले प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने आधी या तलावांमध्ये येणार्‍या सांडपाण्याचे नाले तसेच ड्रेनेजलाइनचे मॅपिंग केले. त्यानुसार या ड्रेनेजलाइन एकमेकांना जोडून त्या थेट सांडपाणी केंद्रात आणल्या जातील. त्यानंतर हे पाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडले जाणार आहे. यातील पाषाण तसेच जांभुळवाडी तलावातील एसटीपीसाठी जागा निश्चित करण्यात आली असून, कात्रज तलावातील एसटीपीसाठी जागा शोधण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.

Back to top button