नाशिक मनपाला प्लास्टिक पुनर्वापरासाठी नाॅर्वे करणार तंत्रज्ञान सहकार्य | पुढारी

नाशिक मनपाला प्लास्टिक पुनर्वापरासाठी नाॅर्वे करणार तंत्रज्ञान सहकार्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नॉर्वे येथील नार्वेजेनियन कॉन्सल जनरल शिष्टमंडळाने नाशिक मनपाला भेट देत प्लास्टिकचा पुनर्वापर, ई-कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आदी विषयांवर सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत मनपामध्ये झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन शिष्टमंडळाने नाशिक मनपाला तंत्रज्ञानाबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मुंबईत असलेल्या नॉर्वे देशाच्या नार्वेजेनियन कॉन्सल जनरल अर्नेजन फ्लोलो आणि त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. ३१) महापालिका मुख्यालयाला भेट दिली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी मनपातर्फे राबविण्यात येणा-या विविध प्रकल्पांची माहिती शिष्टमंडळास देण्यात आली. कॉन्सुलेट जनरल अर्नेजन फ्लोलो यांनी मनपाला भेट देण्याचा उद्देश सांगितला. भारतासोबत गेल्या ५० वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करीत असून, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये भारताबरोबर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या चार क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन अशाप्रकारे भारतातील काही शहरांना नॉर्वे देश सहकार्य करणार आहे. त्या अनुषंगाने भारतातील काही शहरांना भेटी देत तेथील उद्योग आणि पर्यावरणाविषयी माहिती घेत आहेत. विशेषत: प्लास्टिकचा पुनर्वापर, ई-कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, प्रक्रियायुक्त मलजलाचा पुनर्वापर, गाळ व्यवस्थापन, एनर्जी फ्रॉम ग्रीन हायड्रोजन, बायोडिझेल, बांधकाम आणि विल्हेवाट (सी अँड डी वेस्ट मॅनेजमेंट) या घटकांची माहिती शिष्टमंडळ घेत आहे. त्या अनुषंगाने सहकार्याची कार्यवाही केली जात आहे. प्लास्टिकचा पुनर्वापरचे विशेष तंत्रज्ञान उपलब्ध असून, त्या अनुषंगाने नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांशीही शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. नाशिक मनपाला कसे सहकार्य करता येईल, याबाबत नार्वेजेनियन कॉन्सल जनरल शिष्टमंडळ लवकरच राज्य शासनास कळवणार आहे.

बैठकीला नार्वेजियन स्पेशल मिशनचे प्रियद कुलकर्णी, मनपा अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, उपअभियंता रवींद्र बागूल उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button