नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार | पुढारी

नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याकरिता सिन्नर येथील निमा हाउसमध्ये निमा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीला सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम निकम, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, पायाभूत उपसमितीचे चेअरमन सुधीर बडगुजर, सिन्नर डेव्हलपमेंट उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, सिन्नर ऊर्जा उपसमितीचे चेअरमन प्रवीण वाबळे उपस्थित होते.

सिन्नरकडे औद्योगिक नगरी म्हणून बघितले जात असून, अनेक मल्टिनॅशनल उद्योगांबरोबरच लघुउद्योग याठिकाणी कार्यरत आहेत. बहुतांश उद्योगांचे उत्पादन विदेशात निर्यात केले जात असून, त्यांची एक खास ओळख आहे. सिन्नरचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असताना उद्योगांना ज्या अपेक्षित सोयीसुविधा मिळायला हव्यात त्या मात्र मिळत नाहीत. त्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम, डी झोनला मान्यता, मुख्य रस्त्यांचे चौपदरीकरण, मुसळगाव – माळेगाव लिंक रोड आदींचा समावेश आहे. दरम्यान, हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी निमाचे आशिष नहार यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच अनेक प्रश्न हे अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सिन्नर औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व शांततेच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच वसाहतीत चोर्‍यांचे प्रमाण कमी होण्याकरिता पोलिस गस्त वाढविणार असल्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक श्याम निकम यांनी दिले. याप्रसंगी किरण बडगुजर, दीपक जाधव, मिलिंद इंगळे, अनिल सरवार, सचिन कंकरेज, दत्तात्रेय नवले, व्ही. वाय. वांद्रे, अरुण खालकर, विशाल गोजरे, नारायण क्षीरसागर, किरण करवा, विश्वजित निकम, सचिन काटे, सुधीर पाटील, किरण क्षीरसागर, रोमित पटेल, पी. बी. कोल्हे, संजय पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button