टुरिस्ट गाइड प्रशिक्षण राज्यभर राबविणार ; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती | पुढारी

टुरिस्ट गाइड प्रशिक्षण राज्यभर राबविणार ; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनस्थळांविषयी अधिकृत माहिती स्थानिक प्रशिक्षित पर्यटन (टुरिस्ट) गाइड्सकडून मिळणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा परिषदेद्वारे उपयुक्त शिबिराचे आयोजन करून राज्यामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषदेकडून असा उपक्रम राबविला जात आहे. पुढील काळात कौशल्यविकास केंद्र व स्थानिक प्रशासन, याद्वारे अशा पद्धतीचे प्रशिक्षण राज्यभर घेतले जाणार असल्याची माहिती पर्यटन व महिला बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली.

पुणे जिल्हा परिषद, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आणि भवताल यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय गाइड प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. उद्घाटन प्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोढा उपस्थित होते, त्या वेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राहुल काळभोर, उपमुख्य अधिकारी सचिन घाडगे, े समन्वयक पंकज पाटील उपस्थित होते. लोढा म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये ऐतिहासिक स्थळे, साहसी उपक्रमांचा समावेश होतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी टुरिस्ट गाइड महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्यटकांना संस्मरणीय अनुभव देण्यासाठी गाइडची भूमिका महत्त्वाची आहे.

Back to top button