नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर | पुढारी

नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कळवण येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी ओतुर गाव आहे. गावातील ऐतिहासिक जिवंत बारव असून आजही या बारवमध्ये पाणी आढळून येते मात्र उन्हाळ्याच्या कालावधीत बारव कोरड्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. तर परिसरात अस्वच्छता आणि काही भाग पडझडीच्या वाटेवर श्वास घेत आहे.

धोडप किल्ला व येथील बारवेचे कोरीव बारीक नक्षीकाम आजच्या काळातही पर्यावरणप्रेमी व इतिहास संशोधकांचे लक्ष वेधुन घेत आहे.  येथील परिसर अत्यंत शांत व आल्हाददायक असल्याने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक आवर्जुन येथे हजेरी लावतात. विशेषत: तरुणाई ट्रेकींग करण्यासाठी धोडप किल्ल्यावर उड्या मारतात. येथील बारव बांधण्याचे अद्यापपर्यंत कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याने कोणत्या कालावधीमध्ये बारव बांधली गेली असवी याचा अंदाज अद्याप लागलेला नाही. त्याबाबत तसे कोणतेही कागदोपत्री पुरावे अथवा शिलालेख उपलब्ध नाहीत. मात्र बारव होळकर धाटणीची नंदा प्रकारातील बारव असल्याचे इतिहासकारांकडून सांगितले जाते. तर काहीजण पेशवे काळातील ही बारव असल्याचे सांगतात. ही बारव आज जरी सुस्थितीत असली तरी संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि काही भाग पडझडीच्या वाटेवर आहे. त्यामुळे  पुरातत्व विभागाने वेळीच लक्ष देऊन येथील बारव परिसरात स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी पर्यावरणप्रमी व इतिहासप्रेमींकडून होत आहे.

ओतूर येथील ही ऐतिहासीक बारव इतिहासाची साक्ष देते. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना म्हणून ही बारव अजुनही सुस्थितीत असली तरी  दुर्लक्ष आणि अनभिज्ञता यामुळे हा ऐतिहासिक ठेवा लुप्त होण्याची भिती आहे. त्यापूर्वीच बारवचे संवर्धन आणि जतन करणे गरजेचे आहे – राकेश हिरे, इतिहास अभ्यासक, कळवण.

 

हेही वाचा:

Back to top button