जामखेड : बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कामाला लागा : आमदार प्रा. राम शिंदे | पुढारी

जामखेड : बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कामाला लागा : आमदार प्रा. राम शिंदे

जामखेड ; पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बाजार समितीची निवडणूक महत्वाची आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप मोठ्या ताकदीने लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. उमेदवार कोण, यापेक्षा पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावावे. कोणी नाराज होणार नाही, याची आपण पूर्ण काळजी घेऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली मजबूत पकड आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये, असे अवाहन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले.

जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची रणनीती ठरवण्याबरोबर उमेदवार निवडण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी भाजपतर्फे बैठकीत आयोजित करण्यात आली. बैठकीत अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. यानंतर आमदार प्रा. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते,
अनेक गावांचे सरपंच आणि सेवा संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘उमेदवारीची जबाबदारी पदाधिकार्‍यांवर’ :
जामखेड बाजार समिती निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यासाठी पंचायत समिती गण निहाय उमेदवारी ठरवण्याची टीम बनवण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला. गण निहाय टीममध्ये चार जणांचा समावेश आहे. टीममध्ये 25 जणांचा समावेश असून, त्यांच्यावर उमेदवार ठरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘निवडणूक दुरंगी का तिरंगी पुढं बघू’ :
आमदार प्रा. शिंदे म्हणाले, बाजार समितीची निवडणूक दुरंगी व्हायची का तिरंगी पुढचे पुढे बघू. अर्ज माघारी घेईपर्यंत काहीपण होऊ शकते. दहा वर्षे सत्तेत असताना कुठेही कटुता आली नाही, कोणाची चौकशी लावली नाही, कोणाला त्रास दिला नाही, कोणाला आत टाका म्हणले नाही, सौहार्दच्या वातावरणात सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली.

Back to top button