नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर | पुढारी

नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
अत्यंत वर्दळीच्या मुंबई – आग्रा महामार्गावरील अपघातप्रवण अशा चाळीसगाव चौफुली, टेहरे-सोयगाव फाटा आणि सवंदगाव फाट्यावर उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 229 कोटी रुपयांचा मंजूर केला आहे. केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

मालेगाव शहराजवळील चाळीसगाव चौफुली, टेहरे – सोयगाव फाटा व सवंदगाव फाट्यावर वारंवार लहान – मोठे अपघात होतात. अवजड वाहतुकीसह शहरांतर्गत वाहतुकीचा मोठा ताण असलेला मुंबई – आग्रा महामार्ग ओलांडण्यासाठी असलेली व्यवस्था पुरेसी ठरत नसल्याने हे तिन्ही स्थळ असुरक्षित ठरत आहेत. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत खासदार डॉ. भामरे यांनी केंद्रीय सडक परिवहनमंत्री गडकरी यांच्याकडे व्यथा मांडली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर अभ्यास होऊन तिन्ही पुलांसाठी सुमारे 229 कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा झाला. चाळीसगांव चौफुलीवरील उड्डाणपूलासाठी 78.7 कोटी, टेहरे – सोयगाव फाट्यावरील पुलासाठी 70.85 कोटी व सवंदगाव फाट्यावर 80.08 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्यांचे प्रत्यक्षात काम झाल्यानंतर महामार्गावरील तीन अपघातप्रवण क्षेत्र कमी होतील, त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

श्रेयवादासाठी चढाओढ
शहरालगत महामार्गावर तीन उड्डाणपूल मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची स्पर्धा पाहायला मिळाली. ‘मालेगाव मध्य’चे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती यांची छबी असलेले बॅनरही ठिकठिकाणी झळकले. केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून मिळालेल्या यशाबद्दल केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आभार मानणार्‍या या उर्दू भाषेतील फलकांवरून वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले. शहरात नवीन बसस्थानकासमोर जुन्या आग्रा रस्त्यावर 2017 पासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम अद्यापही अर्ध्यावरच आहे. तेव्हा ते कुणाचे श्रेय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपची लावरे ती क्लिप

‘मध्य’ मधून झालेल्या बॅनरबाजीनंतर भाजपने तथ्य मांडण्यावर भर दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धुळे येथील विकासकाम उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणाची क्लिप व्हायरल होत आहे. त्यात गडकरी हे खासदार भामरे यांना उड्डाणपूलाच्या मागणीला चालना दिल्याचे सांगत आहेत.

हेही वाचा:

Back to top button