नाशिकवर पाणी कपातीचे संकट ; मुख्य सचिवांच्या उपस्थितीत आज बैठक | पुढारी

नाशिकवर पाणी कपातीचे संकट ; मुख्य सचिवांच्या उपस्थितीत आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर पाणी कपातीचे संकट आहे. पावसाळा लांबणीवर पडण्याची हवामानाची भविष्यातील स्थिती लक्षात घेत महापालिकेने १ एप्रिलपासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार सुरू केला आहे. जून महिन्यात पाऊस न आल्यास मग जुलैपर्यंतची परिस्थिती लक्षात घेत तोपर्यंत आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, याबाबत मंगळवारी (दि.२८) राज्याचे मुख्य सचिन मनू कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, ही बैठक बुधवारी (दि.२९) होणार असून, यामध्ये पाणी कपातीबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात ६४ टक्के जलसाठा आहे. शहराची रोजची गरज ५४० एमएलडी पाणी इतकी आहे. ते पाहता ३१ जुलैपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणे शक्य आहे. मात्र, आगामी एप्रिल व मे महिना कडक उन्हाळा असून तापमान चढे राहिल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे साहजिकच धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेग जादा असेल. शिवाय येणार्‍या काळात आवर्तन देखील सोडावे लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होण्याची चिन्हे आहेत. त्यात हवामान विभागाने ‘अल निनो’चा धोका वर्तवल्याने यंदाच्या हंगामात मान्सून लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. ऐरवी जुलैअखेर पावसाला सुरुवात होते. ‘अल निनो’च्या इशार्‍यामुळे पावसाला ऑगस्टचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठ्यावर जुलैअखेरपर्यंत तहान भागवली जाऊ शकते. पण वेधशाळेचा इशारा पाहता ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवायचे असेल तर काटकसर करावीच लागणार आहे. त्याचे नियोजन मनपा प्रशासनाने सुरु केले असून एप्रिल महिन्यापासून आठवड्यात एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. तसेच मे महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद केला जाईल. जेणेकरुन काटकसर केल्याने ऑगस्टपर्यंत शहराची तहान भागविणे शक्य होईल. तसेच पावसाला विलंब झाला व असमाधानकारक पाऊस पडल्यास आणखी पाणी कपातीचा कटू निर्णय मनपा प्रशासनाला घ्यावा लागू शकतो.

शहरात ३१ विहीरी

महापालिकेच्या ३१ विहीरी असून आवश्यकता भासल्यास त्यांचा वापर केला जाईल. तसेच वेळेप्रसंगी १६० खासगी विहीरी अधिग्रहीत केल्या जाईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

लवकरच निर्णय

राज्यशासनाच्या सुचनेनंतर महापालिकेने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. याबाबत राज्यशासनाने सर्वच जिल्हांचे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभाग अधिकारी यांच्याशी मंगळवारी (दि.२८) व्हिसीद्वारे संवाद साधला. लवकरच त्यांच्याकडून पाणीकपातीबाबत सूचना प्राप्त होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button