Malegaon : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही : मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांचा इशारा | पुढारी

Malegaon : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही : मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांचा इशारा

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे माझी लढाई ही मुख्यमंत्रिपदासाठी नसून ती लोकशाही वाचावी, संविधान टिकावे यासाठीची आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा काडीचाही संबंध नव्हता, ते आज आपल्याला गुलामगिरीत ढकलू पाहत आहेत. येत्या 2024 च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेवर आले, तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, देशात लोकशाहीच उरणार नाही. म्हणून या लढाईत मला साथ द्या, असे भावनिक आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन करताना, एकाच लढाईचे सोबती असताना नसते फाटे फोडू नका, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असून, त्यांचा अपमान कदापि सहन करणार नाही, असा सूचक सल्लाही ठाकरे यांनी दिला.

येथील कॉलेज ग्राउंडवर रविवारी (दि.26) सायंकाळी शिवगर्जना सभा पार पडली. त्यावेळी शिवसेनेतील बंडाळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, शेतकर्‍यांची दशा आणि देशातील राजकीय स्थिती यांचा धांडोळा घेताना ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. व्यासपीठावर खासदार संजय राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई, अनंत गिते, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, सुधाकर बडगुजर, जयंत दिंडे, उपनेते डॉ. अद्वय हिरे आदींसह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

भाषणाच्या प्रारंभीच ठाकरे यांनी कोरोना काळात मालेगावकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात टप्प्याटप्प्याने शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला होता. पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत, नंतर नियमित कर्जफेड करणार्‍यांना आणि अखेरीला दोन लाखांवरील व द्राक्षबागायतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न होता, मात्र सरकार गेले. तेव्हा सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर उभे होते आणि आज अस्मानीबरोबर सुलतानी संकटाचा अनुभव शेतकरी घेत आहे. शिंदे – फडणवीस सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात, त्यांना शेतकर्‍यांच्या बांधावर जायला वेळ नाही. कृषिमंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. ते अंधारात नुकसान पाहणी करतात. केंद्रीय कृषिमंत्र्यांना अवकाळी विशेष वाटत नाही, याबद्दल खेत व्यक्त करताना तालुक्यातील दोन शेतकर्‍यांशी झालेल्या संवादातील व्यथा मांडली.

भाजपच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. सध्या महाराष्ट्र व मुंबईचे वस्त्रहरण सुरू असून त्यावर शिंदे अवाक्षरही काढत नाहीत. आमचे चिन्ह, नाव चोरीला जाऊ देणारे निवडणूक आयोग गांडूळ झाले आहे. पण त्यांना खेड आणि आता मालेगावच्या जनतेने खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले आहे. ठाकरेपासून कुणीही शिवसेना वेगळी करू शकत नाही. हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या. भाजपने मोदींच्या नावाने मत मागावी. मी माझ्या बापाच्या नावाने मत मागेल, असे आव्हान ठाकरे यांनी भाजपाला दिले. महाविकास सरकारच्या काळात आम्ही हिंदुत्व सोडल्याचे एकतरी उदाहरण द्या, असेही आव्हान देत त्यांनी आम्ही हिंदुत्व सोडले नसून फक्त शेंडी जानव्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नसल्याचे स्पष्ट केले. सत्तेच्या बळावर दबावतंत्र सुरू आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत यादी काढली तर ज्यांच्यावर आरोप केले, त्या सर्वांना भाजपने पक्षात घेतल्याचे दिसेल. तेव्हा भाजपचे भ्रष्ट जनांचा पक्ष असे नामकरण करा, अशी टीकाही त्यांनी केली.

एकत्र लढा तर फाटे फोडू नका : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवत ठाकरे यांनी आपण एकाच लढाईचे सोबती आहोत, तर फाटे फोडू नका, वेळ चुकली तर देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा सावरकरांचा अपमान करू नका, भाजपमधील सावरकरभक्तांनीही अंधभक्त न होता या देशासाठीच्या लढाईत मला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सभेचे प्रास्ताविक पवन ठाकरे यांनी केले. त्यानंतर शुभांगी पाटील, अमशा दादा, गणेश धात्रक, सुभाष देसाई, डॉ. अद्वय हिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : खासदार राऊत

माध्यमात उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार असे बोलले जात असले तरी ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असा विखारी टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. शिवसेना तुटलेली नाही, झुकलेली नाही हा संदेश देण्यासाठी ही सभा होतेय, असे सांगत त्यांनी ‘चिते की चाल..’ या डायलॉगच्या तालावर उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणावर संदेह करत नाही, असे वक्तव्य करत सभेत जोश भरला. मालेगाव के शोले भडकले आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचे तुफान आता कुणी रोखू शकणार नाही. तेव्हा शिवसेनेचे नाव, चिन्ह काढून घेतलेल्या निवडणूक आयोगाने हे चित्र पाहून ठरवावे, असे आव्हान दिले.

नीम का पत्ता कडवा है.. या ओळीनंतर सभेतून साद घेत, खा. राऊत यांनी कांदा रस्त्यावर टाकावा लागत असला, तरी आपल्याला सुहास कांदे, गुलाबरावला फेकायचे आहे. त्यांना त्याच खोक्याखाली चिरडू असे आवाहन केले. कठीण काळात डॉ. हिरे यांनी शिवसेनेचा हात पकडला. कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार यांनी खांद्याला खांदा लावून लढा दिला आता त्यांचे वारसदार लढतील, यातून आपले राज्य येईल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

दगडधोंडे जाताहेत अन् रत्न, हिरे सापडत आहेत ः देसाई

गद्दारी जरी शिवसेना आमदारांनी केली असली तरी यामागे भाजप असल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. मात्र, कटकारस्थानाने आता भाजपच्याच पायाखालची वाळू सरकू लागली असून, दुसरीकडे लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळते आहे. अलीकडे झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने कौल दिला आहे. त्यामुळेच निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांची पावले हुकूमशाहीकडे पडत असली तरी मराठी माणसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावावे.

सभेला विक्रमी गर्दी

शिवसेना ठाकरे गटात दाखल झालेल्या उपनेते डॉ. हिरे यांच्यासमोर सभा यशस्वी करण्याचे मोठे आव्हान होते. दुपारी चार वाजेपर्यंत विशेष गर्दी नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु खासदार संजय राऊत, ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नियोजनाने सभास्थळी उद्धव ठाकरे येण्यापूर्वी संपूर्ण मैदान श्रोत्यांच्या विक्रमी गर्दीने भरून गेले होते. अनेकांना ठाकरे हे पालकमंत्री दादा भुसेंविषयी काय बोलतात, याची उत्सुकता होती. परंतु, ठाकरे यांनी त्यांच्याविषयी अवाक्षरही न काढल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला.

Back to top button