नाशिकमध्ये ट्रक उलटून २१ भाविक जखमी | पुढारी

नाशिकमध्ये ट्रक उलटून २१ भाविक जखमी

निफाड|, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खानगाव थडी येथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याने सुमारे २१ हून अधिक भाविक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. जखमींना उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, नांदगाव व चाळीसगाव तालुक्यातील भाविक वडांगळी येथील सती माता – सामत दादा देवस्थानच्या दर्शनासाठी ट्रकने आले होते. दर्शन आटोपून सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत असताना खानगाव थडी येथील वळणावर चालक लक्ष्मण बन्सी राठोड याचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक (क्र. एमएच -१५ एजी – ५७८२) थेट रस्त्यालगतच्या त्र्यंबक सोनवणे (रा. खानगाव थडी) शेतात उलटला. या अपघातात २१ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चालक व एक महिला गंभीर जखमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जखमींमध्ये मांधु चोखा राठोड (वय ४९, रा. कासारी, ता. नांदगाव), गोकुळ मंटु राठोड (वय ३५), मनीष गोकुळ राठोड (वय ‌८९), काप्पल गोकुळ राठोड (वय १०), भाऊलाल सायतान राठोड (वय २०), एकनाथ सलतान राठोड (वय २०, सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव), सुरेश मोहन जाधव (वय २७, नांदगाव), कांताबाई चव्हाण (वय ६०, रा. जातेगाव), महुबाई शंकर चव्हाण (वय ६०, रा. जातेगाव), सुनीता आप्पा राठोड (वय ३५, रा. घोडेगाव), सुवर्णा आप्पा राठोड (वय १६, रा. घोडेगाव), सविता किशोर पवार (वय ४०), विमलबाई सलतान राठोड (वय ३०, रा. घोडेगाव), शितल दत्तू राठोड (वय ४५, रा. घोडेगाव), धोंडीराम राठोड (वय ४०, रा. घोडेगाव), किशोर राजेंद्र पवार (वय २४, रा. चाळीसगाव) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‌ तर संता राठोड (रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव), वाडीलाल राठोड, राकेश राठोड, राहुल राठोड, अनिता राठोड (सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button