Nashik Crime : प्राणघातक हल्ल्यात कंपनी मॅनेजरचा मृत्यू, मारेकरी कार घेऊन फरार | पुढारी

Nashik Crime : प्राणघातक हल्ल्यात कंपनी मॅनेजरचा मृत्यू, मारेकरी कार घेऊन फरार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

इंदिरा नगर व पाथर्डी फाटा परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारकाजवळ हॉटेल अंगण समोर अज्ञात गुंडांनी कंपनीतून घराकडे जाणाऱ्या कंपनीचे मॅनेजर योगेश मोगरे यांच्यावर धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात मारेकरीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक अमरधाम येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनीत मॅनेजर असलेले योगेश मोगरे (वय ३९, रा. कालीबेरी सोसायटी इंदिरानगर) हे गुरुवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास कंपनीतून घराकडे कार मधून जात असताना पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारकाजवळ हॉटेल अंगण समोर अज्ञातांनी त्यांची कार थांबवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अज्ञात मारेकरी घटनेनंतर मोगरे यांची कार घेऊन फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त खांडवी, इंदिरा नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे सह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. जखमी मोगरे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना शुक्रवारी (दि.24) सकाळी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिसांनी अज्ञात मारेकरी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे पथक अज्ञात मारेकरी यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे. मयत मोगरे यांच्यावर दुपारी नाशिक अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button