शारदीय नवरात्रोत्सव आजपासून, घटस्थापनेचा मुहूर्त जाणून घ्या… | पुढारी

शारदीय नवरात्रोत्सव आजपासून, घटस्थापनेचा मुहूर्त जाणून घ्या...

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रोत्सवाला आज गुरुवारपासून (दि.7) मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. आज चित्रा आणि वैधृती योग असला, तरी घटस्थापना तिथीप्रधान असल्याने ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाचपासून ते दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. या वेळेत घटस्थापना करता येईल.

यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला, तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदा नवरात्र आठच रात्रींचे आहे. चतुर्थीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ रात्रींचे झाले आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

यंदाचे नवरात्र 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत असून, गुरुवारी (दि. 7) घराघरांमध्ये महिला-युवती उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरणात घटस्थापना करणार आहेत. 10 ऑक्टोबरला रविवारी ललिता पंचमी आहे. 12 ऑक्टोबरला महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) आहे. 13 ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास आहे, तर 14 ऑक्टोबरला गुरुवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे. दुसर्‍या दिवशी 15 तारखेला दसरा आहे.

ज्यांना यंदा कोरोनाच्या संकटामुळे किंवा अशौचामुळे 7 ऑक्टोबरला घटस्थापना करणे शक्य होणार नाही, त्यांनी अशौच निवृत्तीनंतर (अशौच संपल्यावर) 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर किंवा 13 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 14 रोजी नवरात्रोत्थापन करावे, असे दाते यांनी सांगितले.

दाते म्हणाले, ‘महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. 12 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून 45 मिनिटांपर्यंत सप्तमी असली, तरीही मध्यरात्री अष्टमी तिथी मिळत असल्याने त्या दिवशी महालक्ष्मीपूजन आहे. मात्र, दुर्गाष्टमी 13 ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्‍लंघन हे 15 ऑक्टोबर रोजी आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. घटस्थापनेचा हा विजय मुहूर्त महाराष्ट्रात दुपारी 2 वाजून 21 मिनिटे ते 3 वाजून 8 मिनिटांच्यादरम्यान आहे.

एकाच दिवशी दोन माळा नकोत

नवरात्रात देवीला रोज एक माळ अर्पण करताना जितक्या रात्री असतील, तेवढ्याच माळा अर्पण कराव्यात. तिथीचा क्षय असताना एकाच दिवशी दोन माळा अर्पण करू नयेत. त्यामुळे यावर्षी आठच माळा अर्पण कराव्यात, असे आवाहन दाते यांनी केले आहे.

Back to top button