नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती

नाशिक : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेतच्या बैठकीप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, धनंजय बेळे, प्रदीप पेशकार, सुधाकर देशमुख, आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कैलास पाटील आदी.
नाशिक : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेतच्या बैठकीप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, धनंजय बेळे, प्रदीप पेशकार, सुधाकर देशमुख, आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कैलास पाटील आदी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोणत्याही प्रकारचा ठोस उद्देश नसताना सुमारे दोन हजार एकर जागा रोखून धरणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पांजरपोळ जागा ही उद्योगांसाठी का उपलब्ध करून दिली जाऊ नये, याची वस्तुस्थिती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त समिती नेमावी व पुढील १५ दिवसांत याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

चुंचाळे परिसरातील पांजरपोळची जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून द्यावी, या उद्योजकांच्या मागणीबाबत ना. उदय सामंत यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह उद्योजक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात तातडीची बैठक घेतली. यात या जागेबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर पुढील १५ दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. झाडे तसेच गायींच्या नावाखाली जर कोणी दोन हजार एकर जागा रोखून धरत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. पाच एकर जागेमध्ये एक हजार गायींचे संवर्धन करणाऱ्या संस्थेला इतरत्र जागा देण्याचा पर्याय देता येणार नाही काय? तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणत्या परवानगीनुसार झाडांची लागवड केली? असे अनेक प्रश्न उद्योगमंत्र्यांनी उपस्थित केले.

त्याचबरोबर ही जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शविली. नवीन येणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आम्ही नाशिकचा पर्याय सुचवित आहोत. त्याचबरोबर काही जर्मन कंपन्यांशीही गुंतवणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. अशात ही जागा उद्योगासाठी देता येईल काय? याबाबत उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी प्रास्ताविक केले. बैठीकीस निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, निमा उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, गोविंद झा, श्रीकांत पाटील, राजेंद्र कोठावदे, निखिल तापडिया, कैलास पाटील, संजय महाजन आदी उपस्थित होते.

पांजरपोळ जागा उद्योगांना मिळावी याबाबत उद्योगमंत्र्यांसमवेतची बैठक अत्यंत सकारात्मक झाली आहे. उद्योजकदेखील वृक्षप्रेमी असून, त्यांना पर्यावरणाची चिंता आहे. अशात नाशिकच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची आमचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे ही जागा उद्योगांना मिळाल्यास पर्यावरणाची दखल घेतली जाईलच, उगाचच विरोध करून नाशिकचे नुकसान करू नये. – धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा.

पर्यावरणप्रेमी आक्रमक

पांजरपोळ जागेतील वृक्षसंपदा नष्ट केली जाऊ नये म्हणून पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. पांजरपोळ जागेवरील वृक्षसंपदा नाशिकचे 'ऑक्सिजन सेंटर' असून, उद्योगांसाठी येथील झाडे नष्ट केल्यास त्याचा नाशिकच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार असल्याने, पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news