जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको | पुढारी

जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

यावल तालुक्यातील अकलूद येथील शुभम अशोक सपकाळे (24,अकलूद) या तरुणावर महिनाभरापूर्वी चाकूहल्ला झाला होता व उपचारादरम्यान त्याची रविवारी (दि.19) सायंकाळी प्राणज्योत मालवली. यानंतर या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त जमावाने सोमवारी (दि.20) सकाळी 10 वाजता तापी नदीजवळील टोलनाक्यावर तासभर रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली.

21 फेब्रुवारीला सायंकाळी टोलनाक्याजवळून मुकेश तायडे (32, दुसखेडा, ह.मु.अकलूद) व शुभम सपकाळे (24, अकलूद) हे दुचाकीवरून जात असताना जुन्या वादातून संशयित आरोपींनी चाकूहल्ला केल्याने शुभम हा तरुण गंभीर जखमी झाला होता. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या शुभम सपकाळे या तरुणावर भुसावळातील खासगी रुग्णालयात सुमारे एक महिन्यापासून उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला अविनाश श्यामलाल गुप्ता व राज रामचरण गुप्ता (दोन्ही रा. अकलूद, ता.यावल) या चुलतभावांना अटक करण्यात आली असून, ते सध्या कारागृहात आहेत.

हेही वाचा:

Back to top button