नाशिक : वातावरणाच्या लहरीपणाचा गृहउद्योगांना बसतोय फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फेब्रुवारी महिना सुरू झाला की, घरात वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते. नोकरदार महिलांना असे पदार्थ बनवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने गृहउद्योग करणार्या महिला नोकरदार महिलांसाठी मोठा आधार ठरताना दिसतात. पण, सध्या वातावरणाच्या लहरीपणामुळे महिलांच्या गृहउद्योगावर परिणाम होताना दिसत आहे. वाळवणाचे पदार्थ बनवण्याची प्रक्रिया मोठी असते; शिवाय त्याला कडक उन्हाची जोड लागते. पण, अचानक येणार्या पावसामुळे काम थांबवावे लागत असल्याचे गृहउद्योजक सांगतात. संसाराला हातभार म्हणा किंवा नोकरीच्या वेळेची अडचण लक्षात घेता शहरात अनेक महिला रोजगार म्हणून गृहउद्योगाला घरातूनच सुरुवात करतात. पापडांचे विविध प्रकार, कुरडई, उपवासाचे विविध पदार्थ, वड्यांचे प्रकार असे अनेक पदार्थ या महिला मागणीनुसार बनवून देतात. यामुळे नोकरदार महिलांचे काम वाचते आणि गृहउद्योग करणार्या महिलांना रोजगार मिळतो. या महिला व्हॉट्सप ग्रुप, सोशल मीडियाचा वापर करून कामाची माहिती इतरांपर्यंत तर पोहोचवतात. शिवाय माउथ पब्लिसिटीमुळे त्यांच्या व्यवसायाची माहिती अनेकांपर्यंत पोहोचत असल्याने गृहउद्योजक महिला आता स्मार्ट बनल्या आहेत.
पारंपरिक कृतीलाच प्राधान्य
पापड लाटण्यासाठी पोळपाट लाटण्याचा उपयोग केला जातो. मशीनवर पापड केला तर त्याची विक्री होत नाही आणि पापड फुलत नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार पापड हातानेच लाटलेला हवा. त्यामुळे तो चांगला फुलतो, चव चांगली लागते म्हणून पारंपरिक कृतीलाच ग्राहकांकडून पसंती मिळते.
अशा आहेत किमती….
100 नागली पापड 350 रुपये
100 तांदूळ पापड 250 रुपये
100 ज्वारी पापड 350 रुपये
100 पोहा पापड 250 रुपये
100 गहू कुरडई 460 रुपये
साबुदाणा पळी पापड 250 रुपये किलो
साबुदाणा बटाटा चकली 300 रुपये किलो
साबुदाणा कुरडई 250 रुपये किलो
हाताने केलेले किंवा तोडून केलेले वडे 260 रुपये किलो
मी आणि भावाची बायको अशा दोन्ही मिळून आम्ही गृहउद्योगाला सुरुवात केली. मशीनने पापड करून बघितले होते, पण माझे ग्राहक तुटल्याने पुन्हा हाताने पापड करायला सुरुवात केली आणि ग्राहकांची संख्या आपोआप वाढायला लागली. – सारिका शिंदे, गृहउद्योजक.
हेही वाचा:
- पुणे : तब्बल 17 वर्षांपासून फरारी असणारा जेरबंद
- मनरेगाकडून कोपरगावास 2.30 कोटी; आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यास अखेर आले यश
- वाळकी : ..तर 51 गावांना मिळू शकेल पाणी ! ‘साकळाई’ची व्याप्ती वाढविण्याचा प्रस्ताव