वाळकी : ..तर 51 गावांना मिळू शकेल पाणी ! ‘साकळाई’ची व्याप्ती वाढविण्याचा प्रस्ताव | पुढारी

वाळकी : ..तर 51 गावांना मिळू शकेल पाणी ! ‘साकळाई’ची व्याप्ती वाढविण्याचा प्रस्ताव

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील कायम दुष्काळी गावांसाठी वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास नुकतीच राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेची व्याप्ती वाढविल्यास नगर, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील 51 गावांना नैसर्गिक उताराने सहज पाणी मिळू शकेल, असा प्रस्ताव द. भोर फौंडेशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी मांडला आहे.

योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हंटले की, योजनेसाठी आदमासे 2.5 टीएमसी पाणी लागणार आहे. कुकडी प्रकल्पातील अच्छादित भागातील देण्यात येणारे 4.95 टीएमसी पाणी आता साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी वळविण्यात येत आहे. या 4.95 टीएमसी पाण्यातून आता नमूद योजनेसाठी 2.5 टीएमसी पाण्यापेक्षा ज्यादा पाण्याची गरज पडली, तरीही पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकते आणि या योजनेची व्याप्ती वाढू शकते.

यापूर्वी पाण्या अभावी क्षेत्र व गावाची संख्या योजनेमध्ये मर्यादित म्हणजे 29 गावे ठेवली होती. परंतु, उपलब्ध पाणी पाहता सदरची व्याप्ती 51 गावांपर्यंत वाढवता येऊ शकते. घोड धरणांमधून पाण्याची उचल केल्यानंतर ती साकळाई जवळील चिखली येथे आणून टाकण्याऐवजी चिखली व घोसपुरीच्या मध्यावर व माथ्यावर 760 मीटर उंचीवर आणून टाकल्यास 29 गावांऐवजी 51 गावांना पाणी जाऊ शकते आणि पूर्वीपेक्षा जास्त व पुरेशा दाबाने पाणी मिळू शकते. यामध्ये मूळ योजनेच्या खर्चात काही प्रमाणात वाढ होईल. पंपिंगचा कालावधी वाढू शकतो; परंतु जास्त क्षेत्रास व शेतकर्‍यांना फायदा होईल. या सर्व बाबींचा विचार करून या 59 गावांचे सर्वेक्षण होऊन त्याप्रमाणे योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबत संबंधित यंत्रणेस सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

या गावांना मिळू शकतो लाभ
कोरेगाव, चिखली, उख्खलगाव, रांजणगाव मशिद, अस्तगाव, भोरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरेझरे, वाळकी, शिराढोण, साकत, दहिगाव, वाटेफळ, वडगाव (तांदळी), तांदळी (वडगाव), देऊळगाव सिध्दी, गुंडेगाव, राळेगण (म्हसोबाचे), गुणवडी, आंबिलवाडी, रुईछत्तीसी, मठपिंप्री, हातवळण, बनपिंप्री, बांगर्डे, रुईखेल, मांडवगण, म्हाडूळवाडी, खांडगाव, पिसोरे, कोसेगव्हाण, भानगाव, कामठी, वडघुल, ढोरजे, कोतूळ, कोळगाव, पांढरेवाडी, विठेकरवाडी, भापकरवाडी, घुटेवाडी, लगडवाडी, सुरेगाव, मुंगुसगाव, घोटवी, सुरोडी आदी.

Back to top button