अळकुटी : बिबट्याने पाडला शेळ्यांचा फडशा; पिंजरा लावण्याची मागणी

अळकुटी; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाच्या थैमानाने बळीराजा अडचणीत असताना पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे बिबट्याने 10 शेळ्यांचा फडशा पाडला. यामुळे लोणी मावळा परिसरात भीतीचे वातावरण आहे. लोणी मावळा येथील पडवळ मळा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळासाहेब शेंडकर यांच्या 10 शेळ्या घरांत बांधल्या होत्या.
सोमवारी (दि. 6) रात्री 12 ते एकच्या दरम्यान घराच्या भिंतीवरून बिबट्याने उडी घेऊन घरात प्रवेश केला. घरात बांधलेल्या शेळ्यांच्या नरड्याला चावा घेऊन सर्व शेळ्या मारून टाकल्या. रात्री वारा, पाऊस व वीजेचा कडकडाट असल्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या वेळी शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज घरातील लोकांना आला नाही. सकाळी उठल्यावर शेळ्या बाहेर बांधण्यासाठी घरातील महिला तिथे गेल्या असता शेळ्या मृत दिसून आल्या.
या घटनेची माहिती सरपंच वंदना मावळे व देवराज शेंडकर यांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी हरिभाऊ आठरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने परिसरातील बिबट्या, त्याची मादी व दोन पिल्ले पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी अध्यक्ष स्वप्निल मावळे व संतोष शेंडकर यांनी केली.