नाशिक : ताबा सुटून मोटरसायकल कोसळली, नांदूरमधमेश्वर कालव्यात जवान वाहून गेला | पुढारी

नाशिक : ताबा सुटून मोटरसायकल कोसळली, नांदूरमधमेश्वर कालव्यात जवान वाहून गेला

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पत्नी व मुलांसह मोटारसायकलने जाणार्‍या केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत जवानाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल गोदावरी उजव्या कालव्यात कोसळली. यात जवानाच्या पत्नी व दोन मुलांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. जवान कालव्याच्या पाण्यात वाहून गेला असून रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.

गणेश सुकदेव गिते (36) असे या जवानाचे नाव असून ते पत्नी मुलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून मोटारसायकलने गावाकडे परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी (दि.9) सायंकाळी 6 वाजेच्या ही घटना घडली. मेंढी येथील गणेश सुकदेव गिते केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत असून पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात आहे. 24 फेब्रुवारी रोजी ते सुट्टीवर आलेले आहेत. गणेश पत्नी रुपाली (30), मुलगी कस्तुरी (7) व मुलगा अभिराज (दीड वर्षे) यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेले होते.

सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरापासून 300 मिटर अंतरावर तवंग परिसरात मेंढी-ब्राम्हणवाडे रस्त्यावरील वळणावर गणेश यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल उजव्या कालव्यात पडली. कालव्याला आवर्तन सुटलेले असल्याने मोटारसायकल पडण्याचा आवाज होताच जवळच असलेल्या नितीन रावसाहेब गिते याने धाव घेतली. पाण्यात पडल्यानंतर गणेश व नितीन यांनी गणेशची पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी व मुलगा अभिराज यांना बाहेर काढले. मात्र पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेला. घटनेनंतर आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा शोध सुरु केला.

दरम्यान, घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार, हवालदार हिरामण बागुल, विजयसिंग ठाकुर, पोलिस नाईक धनाजी जाधव, विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत गणेश यांचा शोध सुरु होता.

हेही वाचा :

Back to top button