नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले | पुढारी

नाशिक : कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी नेते सरसावले

नाशिक (देवळाली कॅम्प) : संजय निकम
येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीचा कार्यक्रम संरक्षण मंत्रालयाकडून राजपत्राद्वारे प्रसिद्ध होताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सरसावले आहेत. बोर्डासाठी 30 एप्रिलला मतदान, तर
2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळते यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर देवळाली शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. याच बालेकिल्ल्यात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (ठाकरे गट) बाळासाहेब ठाकरे शिवसेना (शिंदे गट) असे दोन गट पडल्याने त्यांची भूमिका अजून गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे. तर मागील निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप, मित्रपक्ष, रिपाइं मिळून सहा जागा जिंकल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डावर भाजपची सत्ता होती. म्हणूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सानप यांची पुन्हा कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली असून, भाजपकडून निवडणुकीबाबत हालचाली सुरू आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आठही वॉर्डांत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रतन चावला यांनी दिली आहे. पूर्वीपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक ही पॅनलच्या माध्यमातून लढवत होते. मात्र, 2015 मध्ये प्रथमच पक्षांकडून निवडणूक लढविण्यात आल्याने भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत झाली होती. त्यात भाजप व मित्रपक्ष, रिपाइं अशा सहा जागा, शिवसेना व अपक्ष एकेक असे आठ उमेदवार निवडून आले होते. भाजपच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड व्हावी म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष स्व. दिनकर आढाव यांची कन्या प्रीतम आढाव यांच्या नावासह अजूनही दोन नावे संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती. याबाबत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने केंद्रात सेटिंग सुरू केली. मात्र, ऐनवेळी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रीतम आढाव यांची निवड झाल्याचे राजपत्राद्वारे प्रसिद्ध केल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. आता निवडणूक लागल्याने ती चांगलीच रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे.

नावनोंदणीसाठी मतदारांची धावपळ
याच काळात कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होणार, अशी चर्चा सुरू असताना संरक्षण मंत्रालयाने निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करताच देवळालीकरांनी स्वागत करत जल्लोष केला आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, आठही वॉर्डांतील अनेक मतदारांची नावे मतदारयादीमध्ये नसल्याने गोंधळ उडाला आहे. जो तो आपले नाव टाकण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने नावे नोंदवण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, अजूनही निवडणूक महिनाभर लांबणीवर असून, नावनोंदणीसाठी मुदतवाढ मिळेल की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा:

Back to top button