नाशिक : एचएएलला ६० ‘एचटीटी- ४०’ ट्रेनर विमाने तयार करण्याचे काम | पुढारी

नाशिक : एचएएलला ६० 'एचटीटी- ४०' ट्रेनर विमाने तयार करण्याचे काम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशाच्या सीमा सुरक्षित असाव्यात, यापोटी वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले ‘एचटीटी- ४०’ जातीचे विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे एचटीटी- ४० जातीचे ६० विमाने तयार करण्याचे काम ओझर येथील एचएएल कंपनीला मिळाले असून, यासाठी ६,८०० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे तीन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल एचएएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध जातीचे विमाने तयार करण्याची एचएएल ही केंद्र शासनाची मोठी कंपनी आहे. एचएएलमध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. विविध जातींची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा हातखंडा आहे. परंतु, गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी आहे. यातूनच विमाने तयार करण्याचे वाढीव काम एचएएल कंपनीला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून गोडसे प्रयत्नशील होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सचिव संजय कुटे, गिरीश पाटील, प्रशांत आहेर, नितीन पाटील आदींनी दिल्ली येथे संरक्षण विभागाचे सचिव अजयकुमार यांची भेट घेतली होती. ओझर एचएएल कंपनीला विमाननिर्मितीची ऑर्डर देण्याचे साकडे गोडसे यांनी अजयकुमार यांना घातले होते. एचटीटी-४० जातीचे विमाने तयार करण्याच्या कामाला येत्या काही दिवसांत प्रारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण

सचिव अजयकुमार यांनी सकारात्मक दखल घेत एचटीटी-४० जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएलला देण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. पैकी १० विमानांची निर्मिती बंगळुरू येथील एचएएलमध्ये तर उर्वरित ६० विमानांची निर्मिती ओझर एलएएलमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी सहा हजार ८०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. वायुदलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विमानाचा ताशी स्पीड ४०० किमी असेल. विमान एकाच वेळी तीन तास हवेत राहू शकणार आहे. विमान पूर्णतः भारतीय बनावटीचे असेल.

हेही वाचा :

Back to top button