अल्पवयीन पत्नीवर बलात्कार; पती निर्दोष : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | पुढारी

अल्पवयीन पत्नीवर बलात्कार; पती निर्दोष : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन पत्नीशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातून आरोपी पतीची निर्दोष मुक्तता केली. उच्च न्यायालयाने या पतीला दोषी ठरविले होते. त्याविरोधात त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

बलात्काराच्या व्याख्येतील अपवादाच्या तरतुदीचा लाभ देऊन न्यायालयाने त्याची सुटका केली. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. पीडित १६ वर्षांखालील (गुन्हा घडला तेव्हा) असल्याने तिने शारीरिक संबंधांसाठी दिलेल्या संमतीला कायद्याने काहीच अर्थ नसतो. त्यामुळे पती बलात्काराच्या गुन्ह्याचा दोषी ठरतो, असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते. दोषीच्या पत्नीनेही न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तिने आरोपीसोबत लग्न केले आहे. दोघांना एक अपत्यही आहे. संबंधांना माझी संमती होती, असे तिने त्यात म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने ते ग्राह्य धरले. भा.दं.वि. कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या नमूद आहे. त्यात वैवाहिक बलात्काराला अपवादाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पत्नीचे वय १५ वर्षांच्या वर असेल, तर पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही. दाखल प्रकरणात पती व पत्नीमध्ये लैंगिक संबंध असले, तरी पत्नीचे वय १५ वर्षांहून जास्त असल्याने हे प्रकरण बलात्काराचे ठरत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले.

Back to top button