नाशिक : ८७ वर्षीय आजींनी सैनिकांना दिली पाच लाखांची भेट | पुढारी

नाशिक : ८७ वर्षीय आजींनी सैनिकांना दिली पाच लाखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील ८७ वर्षीय आजींनी देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या सैनिकांच्या कल्याण मंडळास पाच लाखांचा धनादेश देत सैनिकांबद्दल ॠण व्यक्त केले.सैनिकांच्या कल्याण मंडळास पाच लाखांचा धनादेश देणा-या सुशीला कुलकर्णी या लघुउद्योग भारती संस्थेचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांच्या मातोश्री आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले आहेत.

अनेक संकटांचा सामना करताना त्या दोनवेळा मोठ्या आजारातून बचावल्या. देशसेवेसाठीच आपल्याला परमेश्वराने वाचवले अशी भावना निर्माण झाल्याने त्यांनी सैनिकांसाठी मदत देण्याचा मनोदय विवेक कुलकर्णी यांच्याकडे बोलून दाखवला होता. त्यानुसार सुशीला कुलकर्णी यांनी सैनिक कल्याण मंडळाला पाच लाखांचा धनादेश दिला. निवृत्त कमांडर विनायक आगाशे आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाचे ले. कमांडर ओमकार कापले यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आपल्या मदतीचा विनियोग सैनिकांबरोबर त्यांच्या अवलंबितांवर करण्याची ग्वाही कापले यांनी दिली. यावेळी गीता आगाशे, सैनिक कल्याण मंडळाचे सहायक अधिकारी अविनाश रसाळ यांच्यासह विवेक कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, दिनेश खरे, स्नेहल खरे, प्रशांत थोरात, संदीप शेटे, कमलाकर शेटे, सुमेध कुलकर्णी आदी उपस्थित होते.

देशाच्या सीमेवर लढणारा जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत असतो. खरे तर त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून आपण सैनिक कल्याण मंडळाला धनादेश दिला.

– सुशीला कुलकर्णी

हेही वाचा :

Back to top button